मुंबई : नवे शैक्षणिक तोंडावर असताना राज्यातील शैक्षणिक दैन्यावस्था पुन्हा एकदा समोर आली असून राज्यातील ४ हजार गावे, पाडे येथे विद्यार्थ्यांना घराजवळ शाळा नाही. पहिली ते दहावीच्या राज्यातील जवळपास २४ हजार विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचण्यासाठी दुसरे गावात, वाडी, वस्ती गाठावे लागणार आहे. काही गावांतील विद्यार्थ्यांना अगदी १० ते २० किलोमिटरचा प्रवास करावा लागणार आहे.

सरकारी शाळा बंद करण्याचा शासकीय सोस हा गेल्या काही वर्षांपासून वाढला आहे. किमान प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळांमधील मुलांना त्यांच्या घराजवळ मिळणे आवश्यक असल्याचा निकष सर्रास पायदळी तुडवला जात असल्याचे दिसत आहे. विद्यार्थ्यांना जवळ शिक्षण घेता येईल, अशी सुविधा उपलब्ध करून देण्याऐवजी प्रवास भत्ता देण्याची पळवाट गेली काही वर्षे शासनाने अवलंबली असून अशा विद्यार्थ्यांच्या संख्येतही दरवर्षी वाढ होत असल्याचे दिसते आहे. घराजवळ शालेय शिक्षण उपलब्ध नाही अशी ३ हजार ४६५ वसतीस्थाने गेल्यावर्षी होती. यंदा त्यात वाढ झाल्याचे दिसते आहे. राज्यातील ४ हजार वाडी, वस्त्यांमध्ये शाळा नाही. अशा गावांतील २४ हजार ८२५ विद्यार्थी आहेत.

शिक्षण हक्क कायद्यानुसार विद्यार्थ्याच्या घरापासून एक किलोमिटरच्या परिसरात शाळा असणे आवश्यक आहे. माध्यमिक शाळा पाच किलोमिटरच्या परिसरात असणे अपेक्षित आहे. ती उपलब्ध करून देणे ही शासनाची जबाबदारी आहे. ती पुर्ण करता न आल्याचे पापक्षालन शासन प्रवास भत्ता देऊन करते. एक किलोमिटरपेक्षा दूरवरील शाळेत जावे लागते अशा ३ हजार १८५ वस्त्या आणि तेथील साधारण २२ हजार ४७७ विद्यार्थ्यांची नोंद शासनाकडे आहे.

पायपीट का?

गावांमध्ये शाळा सुरूच झाली नाही. विद्यार्थ्यांना ज्या माध्यमात शिकायचे त्या माध्यमाची शाळा नाही. पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग भरतात. मात्र पुढील वर्ग भरत नाहीत. काही गावांमध्ये अगदी ३०-३५ विद्यार्थी असूनही वर्ग जोडणी झालेली नाही. कमी पटसंख्येमुळे शाळा बंद करण्यात आली आहे.

शाळेपर्यंत पोहोचण्यासाठी अडथळ्यांची शर्यत

शासनाने प्रवासासाठी वाहतूक भत्ता दिला तरीही अनेक भागांतील विद्यार्थ्यांचा प्रश्न सुटत नाही. कोकणातील अनेक शाळा खाडीपलीकडे आहेत. शाळा आणि गावांतील अंतर हे दोन-तीन किलोमिटर दिसत असले तरी होडीतून जावे लागते. पावसाळ्यात अशा भागांतील मुलांना शाळेत जाताच येत नाही. काही भागांत जंगलातून वाट आहे आणि सार्वजनिक वाहतूकीचीही सुविधा नाही.

गेल्या काही वर्षांत, विशेषत° करोनाच्या साथीनंतर एसटीच्या गाड्यांची संख्या घटली आहे. अनेक गावांत एसटी पोहोचत नाही. त्यामुळे भत्ता मिळाला तरी प्रवासाची सुविधा नाही. शाळेच्या वेळेत बस उपलब्ध नाही, अशीही अनेक गावे आहेत. काही गावांतील विद्यार्थ्यांना २० ते ३० किलोमिटर दूर असलेल्या शाळेत जावे लागत असल्याचेही शासकीय नोंदीवरून दिसते आहे. दूरची शाळा, प्रवासाचा वेळ, सुरक्षा अशा कारणांमुळे मुली शाळेपासून दुरावत असल्याचे शिक्षक सांगतात.