मुंबई : बनावट विद्यार्थी व शाळा शोधण्यासाठी शिक्षण संचालनालयाकडून यंदा पटपडताळणी करण्यात येत आहे. त्यानुसार इयत्ता दुसरी, नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांची पटपडताळणी करण्यात येणार आहे. मात्र ही पटपडताळणी नियतकालिक मूल्यांकन चाचणीच्या (पॅट) परीक्षेच्या दिवशी घेणार आहे. तसेच यंदा इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचीही पटपडताळणी होणार आहे.

शिक्षण संचालनालयाकडून यंदा पुन्हा पटपडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी २०१३ व २०१५ मध्ये पटपडताळणी करण्यात आली होती. त्यावेळी अनेक बनावट शाळा व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सापडले होते. त्याचधर्तीवर यंदा पुन्हा पटपडताळणी करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यानुसार प्रथम इयत्ता दुसरी ते आठवी, नववी आणि अकरावीचे हजेरीपट, प्रत्यक्ष उपस्थिती पडताळण्यात येणार होती. मात्र ही पटपडताळणी पॅट परीक्षेच्या दिवशी म्हणजे ११, १५ आणि २२ एप्रिल रोजी होणार आहे. परीक्षेच्या कालावधीमध्ये ही पटपडताळणी होणार असल्याने शिक्षकांकडून याविरोधात संताप व्यक्त करण्यात येत होता. आता ही पटपडताळणी इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचीही करण्याचा निर्णय शिक्षण संचालनालयाकडून घेण्यात आला आहे. इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांची पटपडताळणीही ११, १५ आणि २२ एप्रिल रोजी करण्यात येणार आहे.

या पटपडताळणीसाठी क्षेत्रीय स्तरावरील केंद्रप्रमुख, गटशिक्षणाधिकारी, शिक्षण अधिकारी प्राथमिक व माध्यमिक, लेखाधिकारी अधीक्षक शालेय पोषण आहार, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे अधिव्याख्याता, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकचे अध्यक्ष व विस्ताराधिकारी इत्यादींची नेमणूक करण्यात येणार आहे. दरम्यान, बोगस विद्यार्थी शोधण्यासाठी राबविण्यात येणारी ही मोहीम यापूर्वी दोनवेळा राबविण्यात आली होती. त्यानंतर शाळांमध्ये बोगस विद्यार्थी शोधण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे.