मुंबई : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार गतवर्षी पहिलीची पुस्तके बदलल्यानंतर यंदा इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीची पुस्तके बदलण्यात आली आहेत. ही नवी पुस्तके बालभारतीने तयार केली असून, बालभारतीच्या हीरक महोत्सवी वर्षात प्रथमच एका वर्षात चार इयत्तांची पुस्तके बदलण्यात आली आहेत. ही पुस्तके शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना मिळणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने बालभारतीने इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीची पुस्तके तयार केली असून, ही पुस्तके विद्यार्थी-केंद्रित, कौशल्याभिमुख आणि अनुभवाधारित करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आली आहेत. शाळेच्या पहिल्याच दिवशी ही पुस्तके विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
नव्या पुस्तकांमध्ये विद्यार्थ्यांच्या क्षमता, अध्ययन निष्पत्ती आणि कौशल्य विकास यांना केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. प्रत्येक पाठाच्या सुरुवातीलाच अपेक्षित अध्ययन निष्पत्ती नमूद करण्यात आली असून, शिक्षकांसाठी स्वतंत्र मार्गदर्शक सूचनाही देण्यात आल्या आहेत. या पुस्तकांमध्ये क्युआर कोडद्वारे ई कॉन्टेंट उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना क्युआर कोड स्कॅन केल्यावर संपूर्ण पाठ वाचता येणार आहे. विद्यार्थ्यांचे शिक्षण अधिक आनंददायी, प्रयोगशील आणि अनुभवसमृद्ध करण्यावर या पुस्तकांमध्ये भर दिला आहे.
पाठ्यपुस्तकांची निर्मिती करताना तज्ज्ञ समित्या, विषयतज्ज्ञ, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी), विधितज्ज्ञ आणि दिव्यांग शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहेत. भारतीय ज्ञान परंपरा, स्थानिक संदर्भ, विविध उपक्रम, संकल्पनाचित्रे आणि तक्त्यांच्या माध्यमातून शिक्षण अधिक अनुभवाधारित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
शिवाजी महाराजांवर २० पानांचा धडा सीबीएसईच्या इयत्ता आठवीच्या पुस्तकामध्ये यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्य यावर फक्त दीड पानांचा मजकूर देण्यात आला होता. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षण विभागाकडून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर आता इयत्ता आठवीच्या चॅप्टर तीनच्या मराठा साम्राज्य आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास तब्बल २० पाने इतका दिला आहे. या २० पानांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा सविस्तर इतिहास देण्यात आल्याची माहिती शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली.
