मुंबई: राज्यात गेल्या दोन वर्षात मोबाईलधारकांच्या संख्येत चढउतार सुरु असून दूरध्वनी जोडणीकडे (लँडलाईन) नागरिकांचा पुन्हा कल वळू लागला आहे. तर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक बळकट करण्यावर सरकारचा भर असूनही वाहनांच्या संख्येत मात्र दरवर्षी सातत्याने वाढ होत असून गेल्या वर्षभरात वाहनांची संख्या ४० लाखांनी वाढली आहे. ही वाढ ८.२ टक्के इतकी आहे. राज्यातील रस्त्यांवर प्रति किमी वाहनांची संख्या वर्षभरात १४९ वरून चारने वाढून १५३ झाली आहे.
राज्यात २०२३-२४ मध्ये ५१ लाख ५४ हजार दूरध्वनी होते, ही संख्या २०२४-२५ मध्ये ५३ लाख ६२ हजार इतकी झाली असून एप्रिल ते सप्टेंबर २०२५ या सहा महिन्यांच्या कालावधीत दूरध्वनींची संख्या ८० लाख २९ हजारांवर पोचली आहे. त्यामुळे मोबाईलचा वापर वाढत असला तरी नागरिकांची दूरध्वनीलाही पसंती असल्याचे दिसून येत आहे. मोबाईलच्या संख्येत चढउतार होत असल्याचे चित्र आहे. २०२३-२४ या वर्षात मोबाईलची संख्या १२ कोटी ७६ लाख इतकी होती, ती २०२४-२५ मध्ये सुमारे २० लाखांनी कमी होवून १२ कोटी ५६ लाख ९६ हजार इतकी झाली. मात्र मोबाईलच्या वापरात पुन्हा वाढ नोंदविली गेली असून एप्रिल ते सप्टेंबर २०२५ या सहा महिन्यांच्या कालावधीत मोबाईलची संख्या १२ कोटी ७१ लाखांवर गेली आहे.
शहरांमध्ये वाहनांचा वापर वाढला
राज्यातील वाहनांची संख्या जानेवारी २०२५ मध्ये चार कोटी ८८ लाख होती. ती जानेवारी २०२६ पर्यंत ५ कोटी २८ लाख झाली आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुरेशी नसल्याने, सुबत्ता आणि कर्जसुलभता आदी कारणांमुळे वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. वाहनांची संख्या मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, ठाणे या शहरांमध्ये अधिक असल्याने वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाची समस्या भेडसावणार आहे.
राज्यातील राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषदांच्या देखभालीखालील रस्त्यांची लांबी गेल्या वर्षी मार्च पर्यंत ३ लाख ४५ हजार ८२२ किलोमीटर होती. वर्षाला चार ते सहा हजार किलोमीटर लांबीचे रस्ते बांधले जातात. राज्याच्या विकासासाठी सरकारने रस्ते बांधणीला प्राधान्य दिले आहे. रस्ते विकास महामंडळाच्या वतीने वर्सावा वांद्रे सागरी मार्ग, मुंबई पुणे महामार्गातील खंडाळा मिसिंग लिंक, पुणे येथील चक्राकार वळण, विरार अलीबाग बहुउद्देशीय मार्ग, रेवस रेडी किनारा मार्ग, कोकण हरित मार्ग, जालना नांदेड मार्ग, नागपूर गोंदिया महामार्ग, भंडारा गडचिरोली, नागपूर चंद्रपूर द्रुतगती मार्ग, पुणे नाशिक औद्योगिक मार्ग, पुणे नाशिक ग्रीनफिल्ड मार्ग आणि नागपूर गोवा शक्तीपिठ महामार्ग असे अशा १३ महामार्गांचे काम प्रस्तावित आहे.
विद्युत वाहने वाढली
सरकारने २०१८ मध्ये विद्युत वाहन धोरण जाहीर केल्यानंतर राज्यात विद्युत वाहन वापरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. डिसेंबर २०२५ पर्यंत ९ लाख २७ हजार ६१ विद्युत वाहने नोंद झालेली आहेत. दरवर्षी दोन ते अडीच लाख विद्युत वाहने खरेदी केली जात आहेत. यात दुचाकी वाहनांची संख्या जास्त आहे. एसटी महामंडळाच्या ताफ्यात नवीन बस दाखल होत असल्याने यंदा गेल्या वर्षी पेक्षा ५२५ बस जास्त आहेत. गेल्या वर्षी एसटी बसगाड्यांची संख्या १४ हजार ३६१ होती. ती आता १४ हजार ९२६ वर गेली आहे. वाढत्या वाहन संख्येमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. डिसेंबर अखेर पर्यंत ३६ हजार ४५० अपघात झाले आहेत. यात १५ हजार ५४९ जणांचा मृत्यू झाला आहे तर ३२ हजार १४७ जण जखमी झाले आहेत.
एक हजार कोटीहून अधिक दंडवसुली
वाहतूक नियमांचे उल्लघंन करणाऱ्या वाहनचालकांना डिसेंबर २०२५ पर्यंत एक कोटी ६७ लाख ४६ हजार चलने पाठविण्यात आली असून एक हजार ६३२ कोटी ९४ लाख दंड आकारण्यात आला आहे. त्यातील फक्त २८९ कोटी १४ लाख रुपये दंड वसूल झाला आहे, तर एक हजार ३४३ कोटी ८० लाख रुपये दंडवसुली होवू शकलेली नाही.
विमानप्रवासी वाढले
देशांर्तगत विमान प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. २०२३-२४ मध्ये विमानांच्या उड्डाणाची संख्या ३ लाख ६८ हजार ८१५ होती. ती २०२४-२५ मध्ये ३ लाख ८२ हजार ८१ झाली आहे. यामुळे प्रवासी संख्याही ४८ लाखांनी वाढली आहे. आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये ३८ लाख प्रवाशांनी वाढ झाली आहे. ‘उडे देश का आम नागरीक’ योजने अंर्तगत ४५ हजार विमान उड्डाणे झाली असून १७ लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे. मोबाईल हातात आल्यानंतर टपाल कार्यालय बंद पडत असताना राज्यातील टपाल कार्यालयात चार टपाल कार्यालयांनी वाढ झाली. ग्रामीण व शहरी अशा दोन्ही भागात २०२३-२४ मध्ये १३ हजार ७७२ टपाल कार्यालये होती. यात चार टपाल कार्यालयांनी भर पडून ती संख्या १३ हजार ७७७ झाली आहे. त्याचबरोबर पोस्टमनची संख्या वाढली आहे.एक वर्षापूर्वी १५ हजार २८५ पोस्टमन असलेल्या राज्यात १६ हजार ८४४ पोस्टमन सध्या टपाल वितरणाचे काम करीत आहेत.
राज्यात ११ कोटीहून अधिक इंटरनेट ग्राहक
राज्यात ११ कोटी ३६ लाख इंटरनेट ग्राहक आहेत. यात ग्रामीण भागातील इंटरनेट वापरकर्ते ३ कोटी ४६ लाख आहेत तर शहरी भागातील ही संख्या ७ कोटी ९० लाख आहे. ५ हजार २७२ ठिकाणी सार्वजनिक वाय फाय स्पाॅट देण्यात आलेले आहेत. ६ लाख ९५ हजार ३५२ नागरीक वाय फाय वापरत आहेत.
