मुंबई : राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीने २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाची सुरुवात अत्यंत उत्साही आणि आनंददायी वातावरणात करण्यासाठी ‘शाळा प्रवेशोत्सव २०२६’ या कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी विदर्भ विभागातील शाळा वगळता उर्वरित महाराष्ट्रातील शाळा १५ जून २०२६ रोजी सुरू होत आहेत, तर विदर्भातील शाळा ३० जून २०२६ रोजी सुरू होतील.
शालेय शिक्षणाचा पहिला दिवस विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि संस्मरणीय क्षण असतो. या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत आनंददायी वातावरणात केल्यास त्यांचा उत्साह द्विगुणित होईल आणि त्यांच्या शैक्षणिक प्रवासाची एक सकारात्मक सुरुवात होईल, हा या कार्यक्रमामागचा मुख्य उद्देश आहे. या कार्यक्रमासाठी राज्यपाल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सर्व मंत्री, खासदार, आमदार आणि सर्व स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच सर्व अधिकारी आणि शिक्षणप्रेमी शाळेच्या पहिल्या दिवशी भेट देणार आहेत. दाद
गेल्या वर्षी प्रवेशोत्सवाच्या निमित्ताने मान्यवरांनी केलेल्या शाळा भेटींमुळे समाजात शैक्षणिक गुणवत्तेबाबत एक सकारात्मक वातावरण निर्माण झाले होते. यावर्षीही मान्यवरांची उपस्थिती आणि त्यांचे मार्गदर्शन विद्यार्थी, शिक्षक तसेच पालकांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी अत्यंत प्रेरणादायी ठरणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० आणि ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ च्या प्रभावी अंमलबजावणीला गती दिली जाणार आहे. या कार्यक्रमांतर्गत शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गणवेश आणि पुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे.
शाळांमधील पटसंख्या आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढण्यास मदत
विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील शिक्षणाचा पहिला दिवस हा आनंदाचा आणि उत्साहाचा असावा, या भावनेतून आम्ही राज्यभर शाळा प्रवेशोत्सव आयोजित करत आहोत. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी व सर्व अधिकारी यांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील शाळांना भेट द्यावी. सर्वांच्या सहभागामुळे शासकीय शाळांमधील पटसंख्या आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढण्यास नक्कीच मोठी मदत होईल आणि विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल अधिक ओढ निर्माण होईल, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केला.
