मुंबई : सिकलसेल आजाराचे प्रमाण अधिक असलेल्या राज्यातील २१ जिल्ह्यांतील प्रत्येक नागरिकाची सिकलसेल तपासणी झाली पाहिजे. एकही नागरिक सिकलसेल तपासणीपासून वंचित राहू नये, याची काटेकोर दक्षता घेण्याच्या सूचना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या. राज्यात राबविण्यात येत असलेल्या सिकलसेल तपासणी विशेष पंधरवडा मोहिमेच्या धर्तीवर आबिटकर यांनी आरोग्य विभागाला सूचना दिल्या.

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने राज्यात १८ डिसेंबर २०२५ ते १५ जानेवारी २०२६ या कालावधीत सिकलसेल अभियानाची पूर्वतयारी करण्यात येणार आहे. त्यानंतर १५ ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत ‘सिकलसेल तपासणी विशेष पंधरवडा’ राबविण्यात येणार आहे. या तपासणी मोहिमेदरम्यान सिकलसेल आजाराचे प्रमाण अधिक असलेल्या २१ जिल्ह्यांमध्ये एकही नागरिक तपासणीपासून वंचित राहू नये, यासाठी सर्व यंत्रणांनी प्रभावी नियोजन करावे. सिकलसेल आजाराचे लवकर निदान, रुग्णांना योग्य उपचार व संदर्भ सेवा उपलब्ध करून देणे अत्यंत महत्त्वाचे असून, राज्यात एकही सिकलसेल रुग्ण तपासणीपासून वंचित राहू नये, असेही आबिटकर यांनी सांगितले.

आरोग्यमंत्र्यांच्या मंत्रालयातील दालनात गुरुवारी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विविध विषयांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस आरोग्य विभागाचे सचिव ई. रवींद्रन, आरोग्य आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, आरोग्य संचालक डॉ. विजय कंदेवाड, सहसंचालिका डॉ. सुनीता गोल्हाईत यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी आरोग्यमंत्र्यांनी सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत कार्यरत वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन दरमहा १ ते ५ तारखेपर्यंत अदा झाले पाहिजेत, वेतन अदा करण्यात दिरंगाई झाल्यास संबंधित अधिकाऱ्याला जबाबदार धरले जाईल, असेही आबिटकर यांनी स्पष्ट केले.

तसेच जिल्हा आरोग्य संस्थांनी आवश्यकतेनुसारच खरेदी करावी, अनावश्यक खर्च टाळावा व कार्यात पारदर्शकता ठेवावी, अशा सूचनाही आरोग्यमंत्र्यांनी या बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या.