मुंबई- निवडणूक आयोगाच्या माध्यमातून गेले तीन महिने राज्यात राबविण्यात आलेल्य मतदारयाद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणी (एसआयआर) मोहिमेचा सर्वात मोठा फटका मुंबई उपनगर, ठाणे, पुणे जिल्हयांना बसला आहे. केवळ या जिल्हयातून तब्बल ८४ लाख मतदारांच्या नावाला कात्री लावण्यात आली आहे. तर एसआयआर मोहिमेनंतर पुणे जिह्यात सर्वाधिक मतदार नोंदणी झाल्याचे आढळून आले आहे.

एसआयआर मोहिमेपूर्वी राज्यात एकूण ९कोटी ७८ लाख ५४ हजार ४९ मतदार होते. या मतदार याद्यांची विधानसभा मतदार संघ निहाय सखोल तपासणी करुन या याद्या परिपूर्ण आणि अद्ययावत करण्यासाठी निवडणूक आयोगामार्फत गेले तीन महिने विशेष मोहिम राबविण्यात आली होती. या मोहिमेला मतदारांचा अधिकाधिक प्रतिसाद मिळावा यासाठी तीनवेळा मुदत वाढही देण्यात आली होती. मतदारांकडून गणना प्रपत्र भरुन घेऊन त्याच्या आधारे प्रारुप मतदार यादी जाहीर करण्यात आली असून त्यात ७ कोटी ७१ लाख ६५ हजार ५६२ (७८.८६टक्के) मतदारांना समाविष्ट करण्यात आले आहे. तर २१.१४ टक्के म्हणजेच जुन्या मतदार यादीतील २ कोटी ६ लाख ८८ हजार ४८७ मतदारांची नावे विविध कारणांनी वगळण्यात आली आहेत. यामध्ये ३४ लाख मयत मतदारांची तर १७ लाख मतदारांची नावे दुबार नावे होती. ती एका मतदार संघातून रद्द करण्यात आली आहेत. याचाच अर्थ सुमारे ५० लाख मतदारांची नावे कायमची रद्द झाली असून उर्वरित दीड कोटी मतदारांना निवडणूक आयोगाने बोगस मतदार ठरवून धक्का दिला आहे. या सर्व मतदारांना गणना प्रपत्र देण्यात आले होते. मात्र मतदारांनी ते भरून मतदान नोंदणी अधिकाऱ्यांकडे जमा केलेले नाही. मतदार यादीतून नावे रद्द होण्यामध्ये पुणे जिल्हा आघाडीवर असून तेथील तब्बल २८ लाख ६६ हजार ४८१ मतदारांची नावे प्रारुप यादीत रद्द करण्यात आली आहेत. अशाच प्रकारे ठाणे जिल्हयातील २८ लाख ५९ हजार ३७७ तर मुंबई उपनगर जिल्हयातूल २६ लाख ५८ हजार २०२ आणि नागपूर जिल्हयातून१४ लाख ४३ हजार २२६ मतदारांच्या नावांना कात्री लावण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्हयात सर्वात कमी म्हणजे ८२ हजार ५१३ मतदारांची नावे प्रारुप यादीतून वगळण्यात आली असून हिंगोली जिह्यात ८५ हजार ३०९ तर गडचिरोलीत ९० हजार ६०६ मतदारांची नावे रद्द झाली आहेत.

एसआयआर मोहिमेनंतरही राज्यात सर्वाधिक मतदार पुणे जिह्यात नोंदले गेले आहेत.या जिल्हयात तब्बल ६२ लाख १३ हजार ६९२ मतदारांचा प्रारुप मतदार यादीत समावेश झाला आहे. त्या खालोखाल मुंबई उपगरात ५१ लाख ७१ हजार ८०९ तर ठाणे जिह्यात ४५ लाख ९१ हजार १३८, नाशिक जिलह्यात ४० लाख ७६ हजार६६६ आणि नागपूरात ३१ लाख ९५ हजार ३२२ मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ठ झालेली आहेत.