MSBSHSE / मुंबई : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षेचा निकाल आज, ८ मे रोजी जाहीर होणार आहे. हा निकाल ॲानलाईन जाहीर होणार असून दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे. राज्यभरातून १६ लाख १५ हजार ४८९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून, मुंबई विभागातून ३ लाख ४८ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे.

राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजी नगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागांतर्फे यंदा दहावीची परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्चदरम्यान घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल आज दुपारी १ वाजता जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल मंडळाने जाहीर केलेल्या संकेतस्थळांवर पाहता येणार आहे.

या संकेतस्थळावर पाहता येणार निकाल

https://results.digilocker.gov.in, https://mahahsscboard.in, https://hscresult.mkcl.org, https://results.targetpublications.org, https://results.navneet.com, https://www.tv9marathi.com, https://education.indianexpress.com/boards-exam/maharashtra-ssc-10-results या संकेतस्थळांवर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे. त्याचप्रमाणे डिजीलॉकर ॲपमध्ये डिजिटल गुणपत्रिका संग्रहित करून ठेवण्याची सोय उपलब्ध करण्यात आली आहे.

गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतीसाठी ९ मेपासून करता येणार अर्ज

ऑनलाईन निकालानंतर माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मुल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळ https://mahahsscboard.in वरून स्वतः किंवा शाळांमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. गुणपडताळणीसाठी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतीसाठी ९ ते २३ मे २०२६ दरम्यान अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येईल.

पुरवणी परीक्षेसाठी स्वतंत्र अर्ज भरून घेणार

जून-जुलै २०२६ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परिक्षार्थी, श्रेणीसुधार व खाजगीरित्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन पध्दतीने आवेदनपत्रे भरून घेण्यात येणार आहेत. त्याबाबतचे परिपत्रक स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार आहे.