मुंबई : यंदा शालान्त परीक्षेच्या राज्यातील निकालामध्ये २.०१ टक्क्यांनी, तर मुंबई विभागाच्या निकालामध्ये ०.८७ टक्क्यांनी घट झाली आहे. मुंबई विभागाचा निकाल ९४.९७ टक्के इतका लागला आहे. यंदा शालान्त परीक्षेत मुंबई विभागातील १६ हजार २५९ विद्यार्थी अनुतीर्ण झाले. मुंबई विभागातील मुंबईचा निकाल ९५.९६ टक्के, त्याखालोखाल ठाणे जिल्ह्याचा निकाल ९५.०४ टक्के, रायगडचा ९५.०३ टक्के, पालघरचा ९२.९२ टक्के लागला.
राज्य मंडळांमार्फत घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेसाठी यंदा मुंबई विभागातून ३ लाख २५ हजार ९१८ विद्यार्थांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ३ लाख २३ हजार ७३९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यापैकी ३ लाख ७ हजार ४८० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण ९४.९७ टक्के आहे. गेल्या वर्षी दहावीच्या परीक्षेचा मुंबई विभागाचा निकाल ९५.८४ टक्के लागला होता. गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या निकालात ०.८७ टक्क्यांची घट झाली आहे. यंदा दहावीच्या परीक्षेला १ लाख ६६ हजार ६०३ मुले बसली होती. त्यापैकी १ लाख ५५ हजार ९९५ मुले उत्तीर्ण झाली आहेत. उत्तीर्ण मुलांचे प्रमाण
९३.६३ टक्के आहे. तर १ लाख ५७ हजार १३६ मुलींनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १ लाख ५१ हजार ४८५ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. उत्तीर्ण मुलींची प्रमाण ९६.४० टक्के आहे. मुंबई विभागातील ठाणे जिल्ह्यातून १ लाख १० हजार ९०४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १ लाख ५ हजार ४०८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या जिल्ह्याचा निकाल ९५.०४ टक्के लागला. तर रायगड जिल्ह्यातून ३५ हजार २१७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ३३ हजार ४६९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या जिल्ह्याचा निकाल ९५.०३ टक्के लागला. पालघर जिल्ह्यातून ६० हजार ५५० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ५६ हजर २६४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या जिल्ह्याचा निकाल ९२.९२ टक्के लागला.
मुंबईतून ४ हजार ७२९ विद्यार्थी अनुत्तीर्ण
इयत्ता दहावीसाठी मुंबई शहर व उपनगरातून १ लाख १७ हजार ६८ विद्यार्थी परीक्षेला बसले हाेते. यातील १ लाख १२ हजार ३३९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मुंबई शहरातून २५ हजार ३८० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी २४ हजार ४५९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून एकूण निकाल ९६.३७ टक्के लागला. तर पश्चिम उपनगरातून ५० हजार ३५२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यापैकी ४८ हजार ६६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून एकूण निकाल ९६.६५ टक्के लागला. पूर्व उपनगरातून ४१ हजार ३३६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ३९ हजार २१२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण ९४.८६ टक्के आहे.
