मुंबई : राज्य परिवहन (एसटी) महामंडळासह सार्वजनिक वाहतूक अधिक सुरक्षित करण्यासाठी राज्यात ”नशामुक्त चालक, सुरक्षित प्रवास, सक्षम महाराष्ट्र” हे राज्यव्यापी अभियान राबविण्यात येणार आहे. २०२६ ते २०२९ या कालावधीत चालकांच्या मद्य व अंमली पदार्थ तपासणीसाठी एकात्मिक यंत्रणा उभारण्यात येणार आहे. एसटी महामंडळाचे अध्यक्ष या नात्याने चालक-वाहकांच्या ड्रग चाचणीसाठी तपासणी यंत्रे खरेदी करण्यासाठी एक लाख रुपयांची देणगी देणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी केली.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत एसटी महामंडळ व परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या अभियानाचा आराखडा सादर केला. नशेच्या प्रभावाखाली वाहन चालविण्यास प्रतिबंध करण्याबरोबरच जनजागृती, नियमित तपासणी, उपचार आणि पुनर्वसन यांचा समन्वय साधला जाणार असल्याचे सांगितले. या अभियानात एसटी, महानगरपालिका बससेवा, शासकीय वाहने, कंत्राटी वाहने, खासगी बस, पर्यटन वाहने, टॅक्सी, ॲप-आधारित कॅब, रिक्षा तसेच मालवाहतूक सेवांचा समावेश करण्यात येणार आहे. एमआयडीसी, उद्योग, ट्रक-टँकर सेवा, धोकादायक मालवाहतूक, शाळा-महाविद्यालयीन वाहने आणि रुग्णवाहिकांसाठी स्वतंत्र कार्यपद्धती तयार केली जाणार आहे. २०२६ ते २०२९ या कालावधीत टप्प्याटप्प्याने अंमलबजावणीसाठी कृती आराखडा तयार करण्यात येत असून, तपासण्यांची संख्या, उपकरणांची कार्यक्षमता, प्रशिक्षण आणि संस्थांचे पालन यावर डिजिटल प्रणालीद्वारे नियमित देखरेख ठेवली जाणार आहे.
कर्तव्यापूर्वी मद्य चाचणी, आकस्मिक ड्रग तपासणी
जोखमीच्या स्वरूपानुसार चालकांची कर्तव्यापूर्वी मद्य चाचणी, नियोजित व आकस्मिक ड्रग तपासणी; तसेच संशयास्पद प्रकरणांत तातडीने तपासणी करण्याची व्यवस्था केली जाणार आहे. प्रशिक्षित मनुष्यबळ, प्रमाणित उपकरणे आणि डिजिटल नोंद प्रणाली विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे.
विशेष ड्रग टेस्ट किटचा प्रायोगिक वापर
अमली पदार्थांची प्राथमिक तपासणी करण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या विशेष किटचा राज्यात प्रायोगिक वापर करण्यात येणार आहे. हे किट पॅकेट न उघडताच गांजा आणि इतर संशयित अंमली पदार्थांची प्राथमिक छाननी करू शकते. त्यानंतर आवश्यकतेनुसार प्रयोगशाळेतील पुष्टीकरण व कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
उपचार आणि पुनर्वसनालाही प्राधान्य
तपासणीत चालक नशेच्या प्रभावाखाली आढळल्यास त्याला तात्पुरते वाहन चालविण्यापासून मज्जाव करून पर्यायी चालकाची व्यवस्था केली जाईल. व्यसनाधीन चालकांसाठी समुपदेशन, उपचार आणि पुनर्वसनाची सुविधाही उपलब्ध करण्यात येणार असल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले.
