चार महिन्यांमध्ये लांब पल्ल्याच्या ७०० फेऱ्या रद्द

तोटय़ात चाललेल्या एसटी महामंडळाला फायद्यात आणण्यासाठी सध्या एसटीच्या फेऱ्यांचे सुसूत्रीकरण करण्याचा घाट घातला जात आहे. हा प्रकार एसटी महामंडळाच्याच अंगाशी येत असून गेल्या चार महिन्यांमध्ये राज्यभरात लांब पल्ल्याच्या ७०० फेऱ्या रद्द करण्यात आल्या. जास्त उत्पन्नाच्या या फेऱ्यांवर गदा आल्याने अनेक आगारांचे उत्पन्न कमी झाले आहे. परिणामी अनेक आगारांमधील कर्मचाऱ्यांचे पगारही दिरंगाईने मिळत आहेत.

एसटीचे प्रवासी भारमान प्रचंड कमी झाल्यानंतर खडबडून जागे झालेल्या एसटी महामंडळाने बसगाडय़ांच्या फेऱ्यांचे सुसूत्रीकरण करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार दोन जवळच्या आगारांमधून एकाच ठिकाणी जाण्यासाठी सुटणाऱ्या फेऱ्यांची संख्या कमी झाली. कमीत कमी फेऱ्यांमध्ये जास्तीत जास्त प्रवासी वाहून नेण्याच्या महामंडळाच्या धोरणामुळे खर्च कमी होईल, असा अंदाज होता. त्यानुसार मे महिन्यानुसार हे सुसूत्रीकरणाचे काम सुरू झाले.

या सुसूत्रीकरणाच्या कामात मुंबई, ठाणे, भिवंडी, शहापूर, कल्याण, मुरबाड, विठ्ठलवाडी, वाडा, सिंधुदुर्ग, धुळे आणि रत्नागिरी या विभागांमधील आगारांवर गदा आली. या आगारातील प्रत्येक फेरीचे भारमान ५७ ते ७५ टक्के एवढे आहे. तरीही फेऱ्या कमी करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांकडून आश्चर्य व्यक्त होत आहे. मे ते ऑगस्ट या चार महिन्यांमध्ये महामंडळाने या सर्व आगारांमधील मिळून ७००हून अधिक लांब पल्ल्याच्या फेऱ्या रद्द केल्या. त्याचा थेट परिणाम त्या-त्या आगाराच्या उत्पन्नावर झाला. त्यामुळे त्या आगारातील कर्मचाऱ्यांचे पगार देताना अडचणी उद्भवत आहेत.

कर्मचाऱ्यांचे वेतन दिरंगाईने

धुळे विभागातील सहा आगारांमध्ये कर्मचाऱ्यांचे पगार दिरंगाईने देण्यात आले. हीच परिस्थिती सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी विभागांमध्येही निर्माण झाली आहे. फेऱ्यांच्या सुसूत्रीकरणाच्या नावाखाली खासगी वाहतुकीला तर प्राधान्य दिले जात नाही ना, असा संशय आता कर्मचारीच व्यक्त करत आहेत. याबाबत एसटीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजीतसिंह देओल यांना विचारले असता त्यांनी, हे सुसूत्रीकरण एसटीच्या हितासाठीच असून त्यात खासगी वाहतुकीला प्राधान्य देण्याचा काहीच संबंध नसल्याचे स्पष्ट केले.