मुंबई: देशातील पेट्रोल, डिझेलच्या किंमती दिवसेदिवस वाढू लागल्या आहेत. अशा वेळी सार्वजनिक वाहतूक सेवेची भाडेवाढ अपरिहार्य आहे. त्यात एस टी महामंडळ असेल तर प्रश्नच संपला कारण एस टी महामंडळ गेली अनेक वर्ष तोट्यात सुरू आहे. एस टी चे कर्जात अडकलेले चाक वर येण्याचे नाव घेत नाही. आता कुठे काही प्रयत्न परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुरू केले होते, तोच अमेरिका इराण युद्धाचे परिणाम संपूर्ण जगाला भोगावा लागत असताना त्यातून एस टी सुटणे शक्य नाही. त्यामुळे सरनाईक यांनी एस टी भाडेवाढ होणार असे जाहीर करून टाकले. पण एक पंचायत महामंडळासमोर आली आहे. एसटीची भाडेवाढ केली तर डिझेलच्या किमती कितीने वाढणार आहे हे अनिश्चित आहे, कारण भविष्यात डिझेलच्या किमती भरमसाठ वाढणार आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाने थोडं थांबून नंतर एसटी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. एसटीने आता भाडेवाढ केली तर लगेच त्यांना दुसरी भाडेवाढ करता येणार नाही त्यामुळे इंधनाच्या किमती जोपर्यंत स्थिर होत नाहीत, तोपर्यंत ही भाडे वाट लांबणीवर टाकण्यात आली आहे.

डिझेलच्या वाढत्या किंमती पाहता एसटीची भाडेवाढ करण्याशिवाय एसटी महामंडळाला पर्याय शिल्लक नाही. ही भाडेवाढ तूर्त न करता डिझेलच्या किंमती स्थिर झाल्यानंतर करण्यात येईल. गेल्या वर्षी १४.९५ टक्के वाढ करण्यात आली होती. त्याला प्रवाशांनी विरोध केला होता. आता भाडेवाढ झाल्यास प्रवाशांच्या संतापाचा भडका उडण्याची शक्यता आहे.

एसटीची भाडेवाढ अटळ?

एसटी महामंडळाच्या १४ हजार ६०० बस राज्यात आहेत. या सेवेच्या बदल्यात महामंडळ दररोज एक कोटी तोटयात आहे. वाढत्या इंधन किमंती, कर्मचाऱ्यांचे खर्च, सुटे भागांच्या वाढलेल्या किमंती यामुळे गेल्या वर्षी एसटी भाडेवाढ करण्यात आली. अमेरिका इराण युध्दामुळे देशात इंधनाचा तुटवडा जाणवू लागला आहे. दररोज इंधनाच्या किमंती वाढत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला काटकसरीचा सल्ला दिला आहे. तोट्यात असलेली एसटीला भाडेवाढ न केल्यास एसटीचे चाक आर्थिक चक्रात आणखी रुतण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यासाठी एसटीची भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जाहीर केले आहे. ही दरवाढ मात्र डिझेलचे दर स्थिर झाल्यानंतर केली जाणार आहे.

डिझेलचे दर आणखी वाढण्याची शक्यता एका अधिकाऱ्याने व्यक्त केली. एसटीची भाडेवाढ ही डिझेलचा दर, सुट्या भागांची किंमती, कर्मचाऱ्यांचे वेतन यांचा लेखाजोखा मांडून केली जाते. त्यासाठी एक रचना अंमलात आणली जाते. एकदा भाडेवाढ केल्यानंतर पुन्हा भाडेवाढ करणे शक्य होणार नाही. त्यामुळे डिझेल दर स्थिर झाल्यानंतर ही भाडेवाढ होणार आहे, मात्र एसटीची भाडेवाढ अटळ असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.