मुंबई : बारावीचा निकाल हा शैक्षणिक आयुष्याच्या टप्प्यातील एक महत्त्वाचा मानला जातो. डॉक्टर, अभियांत्रिकी, आर्किटेक्ट आदी होण्याचे विद्यार्थ्यांचे स्वप्न या निकालावर अवलंबून असते. मात्र अनेक विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळत नसल्याने ते मानसिक तणावाखाली जातात. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर होताे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना तणावातून बाहेर काढण्यासाठी राज्य मंडळाने स्वतंत्र समुपदेशन सेवा सुरू केली आहे.
राज्य मंडळाने शनिवारी दुपारी १ वाजता ऑनलाईन पद्धतीने बारावीचा निकाल जाहीर केला. यंदा बारावीच्या निकालामध्ये २.०९ टक्क्यांनी घट झाली आहे. त्यामुळे सर्वच विषयांतील निकालावर परिणाम झाला आहे. निकालात घट झाल्याचा परिणाम हा विद्यार्थ्यांवरही होण्याची शक्यता असते. त्यामुळे विद्यार्थी व पालकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या बारावीच्या निकालामध्ये एखाद्या विद्यार्थ्याला अपेक्षित यश न मिळणे, विद्यार्थी अनुत्तीर्ण होणे, काही ठरावीक विषयामध्ये कमी गुण मिळणे असे प्रकार घडतात. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना इच्छित क्षेत्रामध्ये प्रवेश मिळत नाही किंवा पालकांच्या भीतीने ते तणावाखाली येतात. तणावाखाली आल्याने विद्यार्थी चुकीचे पाऊल उचलतात. त्यातूनच आत्महत्त्यासारख्या घटना घडतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी चुकीचे पाऊल उचलू नये यासाठी राज्य मंडळाकडून दरवर्षी विद्यार्थ्यी व पालकांच्या समुपदेशनासाठी समुपदेशकांची नियुक्ती करण्यात येते.
राज्य मंडळाकडून १० समुपदेशकांची नियुक्ती
निकालाच्या तणावातून विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी राज्य मंडळाने १० समुपदेशकांची नियुक्ती केली आहे. हे समुपदेशक बारावीचा निकाल लागल्यापासून सलग पुढील आठ दिवस विद्यार्थी व त्यांच्या पालकांना मार्गदर्शन करून त्यांना तणावातून बाहेर येण्यासाठी मदत करणार आहे. हे समुपदेशन रोज सकाळी ८ ते सायंकाळी ८ या वेळेत उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे विद्यार्थांनी त्यांच्याशी या वेळेत संपर्क साधता येणार आहे. विद्यार्थ्यांना समुपदेशनासाठी उपलब्ध करण्यात आलेली ही सेवा पूर्णपणे निशुल्क आहे. कोणत्याही क्रमांकावर संपर्क साधून समुपदेशांसोबत विद्यार्थ्यांबरोबरच पालकही त्यांच्या समस्या व प्रश्नांचे निरसन करून घेऊ शकतात. सर्व विद्यार्थी आणि पालकांनी या सुविधेची नोंद घ्यावी, असे आवाहन राज्य मंडळाकडून करण्यात आले आहे.
या क्रमांकावर संपर्क साधावा
९९६०६४४४११, ७९७२५७३७४२, ९८३४०८४५९३, ९३५९९७८३१५, ८१६९२०२२१४, ९३७१६६१२५५, ७२०८४२९३८१, ७७०९१५६०६८, ८४२११५०५२८, ९४०४७८३९९६
