आगामी लोकसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खरगे यांनी बुधवारी सादर केलेल्या रेल्वेच्या अंतरिम अर्थसंकल्पाकडे मुंबईकरांचे लक्ष लागले असताना या अर्थसंकल्पात मुंबईसाठी खास अशा काहीच तरतुदी नाहीत. मात्र देशभरात सुरू होणाऱ्या १७ प्रीमियम गाडय़ांपैकी ९ गाडय़ा, ३८ एक्स्प्रेस गाडय़ांपैकी ११ गाडय़ा, ६ नवीन प्रस्तावित रेल्वेमार्ग, देशभरात होणाऱ्या पाचपैकी तीन मार्गाचे दुपदरीकरण अशा तरतुदींमुळे रेल्वेमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या पदरात भरघोस दान टाकले आहे. मात्र कोकणाच्या नशिबी काहीच पडलेले नाही. या अंतरिम अर्थसंकल्पाचे वर्णन ‘महाराष्ट्राला बरेच काही, मुंबईला काहीच नाही’ असेच करता येईल.
यंदा निवडणुकांमुळे रेल्वेच्या अर्थसंकल्पाऐवजी लेखानुदान सादर करण्यात येईल, अशी अपेक्षा होती. मात्र बुधवारी रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खरगे यांनी लोकसभेत अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. रेल्वेमंत्री थोडय़ाच दिवसांपूर्वी मुंबई भेटीवर आले होते. त्या वेळी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी त्यांची भेट घेऊन उपनगरीय प्रवाशांच्या समस्या त्यांच्या कानावर घातल्या होत्या. त्यामुळे अंतरिम अर्थसंकल्पात मुंबईच्या अनेक अपेक्षा पूर्ण होतील, अशी अपेक्षाही होती.
मात्र, रेल्वेमंत्र्यांनी मुंबईकरांसाठी रोख स्वीकारणाऱ्या एटीव्हीएमचा प्रसार, मोबाइलवर अनारक्षित व उपनगरीय तिकिटे आणि जुलैपासून सुरू होणाऱ्या वातानुकूलित उपनगरीय गाडय़ा याव्यतिरिक्त काहीच घोषणा केल्या नाहीत. वास्तविक परळ टर्मिनस, पाचव्या व सहाव्या मार्गाचे परळ व मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसपर्यंत विस्तारीकरण, विकासकामांसाठी निधी, डब्यांची संख्या वाढवण्यासाठी जादा गाडय़ांची खरेदी अशा अनेक अपेक्षा या अर्थसंकल्पाकडून होत्या. मात्र त्यापैकी एकही पूर्ण होऊ शकली नाही.
महाराष्ट्रात सहा नवीन रेल्वेमार्गाचे प्रस्ताव आहेत. यात कराड-कडेगाव-लेणारे-खरसुंडी, बैतुल-अमरावती, मिरज-विजापूर (मार्गे कवठेमहांकाळ), पुणे-बारामती (मार्गे सासवड-जेजुरी-मोरगाव), पुणे-अहमदनगर (मार्गे केडगांव) आणि घाटनंदुर-श्रीगोंदा रोड-दौंड (मार्गे मांजरसुंभा-पाटोडा-जामखेड) या मार्गाचा समावेश आहे. लातूर रोड-कुर्डुवाडी, पुणे-कोल्हापूर आणि परभणी-परळी या मार्गाचे दुपदरीकरण होणार आहे.     

महाराष्ट्राला काय?
प्रीमियम गाडय़ा
* हावडा-पुणे वातानुकूलित एक्स्प्रेसमार्गे मनमाड-नागपूर (आठवडय़ातून दोन वेळा)
* मुंबई-हावडा वातानुकूलित एक्स्प्रेसमार्गे नागपूर (आठवडय़ातून दोन वेळा)
* मुंबई-पाटणा वातानुकूलित एक्स्प्रेसमार्गे खांडवा-इटारसी (आठवडय़ातून दोन वेळा)
* मुंबई-गोरखपूर एक्स्प्रेसमार्गे खांडवा-झाशी (आठवडय़ातून दोन वेळा)
* वांद्रे-कटरा एक्स्प्रेसमार्गे कोटा-नवी दिल्ली-अंबाला (आठवडय़ातून एकदा)
* पटणा-बेंगळुरू एक्स्प्रेसमार्गे नागपूर (आठवडय़ातून एकदा)
* यशवंतपूर-कटरा एक्स्प्रेसमार्गे नागपूर (आठवडय़ातून एकदा)
* निझामुद्दिन-मडगाव वातानुकूलित एक्स्प्रेसमार्गे वसई रोड (आठवडय़ातून एकदा)
* यशवंतपूर-जयपूर वातानुकूलित एक्स्प्रेसमार्गे पुणे-वसई रोड (आठवडय़ातून एकदा)
एक्स्प्रेस गाडय़ा
* औरंगाबाद-रेणुगुंटा एक्स्प्रेसमार्गे परभणी (आठवडय़ातून एकदा)
* वांद्रे-लखनौ जंक्शन एक्स्प्रेसमार्गे कोटा-मथुरा (आठवडय़ातून एकदा)
* भावनगर-वांद्रे टर्मिनस एक्स्प्रेसमार्गे अहमदाबाद (आठवडय़ातून एकदा)
* कानपूर-वांद्रे टर्मिनस एक्स्प्रेसमार्गे मथुरा-कोटा (आठवडय़ातून एकदा)
* हुबळी-मुंबई एक्स्प्रेसमार्गे सोलापूर (आठवडय़ातून एकदा)
* मुंबई-चेन्नई एक्स्प्रेसमार्गे पुणे (आठवडय़ातून एकदा)
* मुंबई-करमाळी (गोवा) वातानुकूलित एक्स्प्रेस (आठवडय़ातून एकदा)
* नांदेड-औरंगाबाद एक्स्प्रेसमार्गे परभणी (आठवडय़ातून एकदा)
* नागपूर-रेवा एक्स्प्रेस (आठवडय़ातून एकदा)
* पुणे-लखनौ एक्स्प्रेस (आठवडय़ातून एकदा)