‘महाराष्ट्र’ सर्वाधिक पर्यटन क्षमता असलेले राज्य

महाराष्ट्रात सर्वात जास्त पर्यटनक्षमता दिसून आल्याचे या सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात पर्यटन उद्योग मजबूत करण्याच्या दृष्टीने जास्त क्षमता असल्याचे निष्पन्न झाले
‘वर्ल्ड ट्रॅव्हल अँड टुरिझम कौन्सिल’चे सर्वेक्षण
देशभरात पर्यटनाच्या दृष्टीने उपलब्ध सोयीसुविधा, आरामदायी प्रवास यांचा विचार करता सर्वाधिक पर्यटनक्षमता असणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र राज्याचा पहिला क्रमांक असल्याचे ‘वर्ल्ड ट्रॅव्हल अँड टुरिझम कौन्सिल’ने ‘एचव्हीएस’ या संस्थेच्या मदतीने केलेल्या सर्वेक्षणातून सिद्ध झाले आहे. देशभरातील सर्व राज्यांचे विश्लेषण केल्यानंतर महाराष्ट्रात पर्यटन उद्योग मजबूत करण्याच्या दृष्टीने जास्त क्षमता असल्याचे निष्पन्न झाले आहे.
‘वर्ल्ड ट्रॅव्हल अँड टुरिझम’ने देशातील ३० राज्यांची पाहणी केली. पर्यटनाच्या दृष्टीने आवश्यक असणारे अर्थकारण, त्यासाठीच्या पायाभूत सुविधा ज्यात निवासासाठी उपलब्ध असलेल्या हॉटेल्सपासून ते प्रवासी साधनांपर्यंत अनेक घटकांची पाहणी करण्यात आली. या राज्यस्तरीय विश्लेषणातून महाराष्ट्रात सर्वात जास्त पर्यटनक्षमता दिसून आल्याचे या सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे.
‘युनायटेड नेशन्स वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन’च्या अहवालानुसार २०१४ मध्ये जगभरात विविध ठिकाणी फिरणाऱ्या पर्यटकांची संख्या १.१३३ दशलक्ष होती. त्यापैकी ०.६७ टक्के पर्यटक भारतभेटीवर होते. तर महाराष्ट्राला भेट देणाऱ्या आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या ४.५ दशलक्ष तर स्थानिक पर्यटकांची संख्या ८.४ दशलक्ष होती. इतर राज्यांच्या तुलनेत हे प्रमाण सर्वात जास्त असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या, सकल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये संबंधित राज्याचा वाटा, प्रभावी मार्केटिंग आणि हवाई वाहतुकीचे प्रमाण या सगळ्या निकषांवर महाराष्ट्र सरस ठरले आहे. मात्र, पर्यटन उद्योगावर सरकारकडून केल्या जाणाऱ्या गुंतवणुकीच्या मुद्दय़ावर राज्य कमी पडले आहे.
‘प्रवास आणि पर्यटन हे आपल्या अर्थकारणाचे महत्त्वाचे अंग असल्याने या आघाडीवर आपल्याला पहिला क्रमांक मिळणे हा मोठा सन्मान आहे’, अशी प्रतिक्रिया राज्य पर्यटन आणि सांस्कृतिक घडामोडी विभागाच्या सचिव वल्सा नायर सिंग यांनी दिली. वेगवेगळ्या कल्पक प्रसार मोहिमा, मार्केटिंग स्ट्रॅटेजी आणि नियोजनबद्ध वाटचालीमुळे आपल्या राज्याला पर्यटन क्षेत्रात हे यश मिळाले असून हे यश आपल्यासाठी नवे मापदंड ठरले आहे. लवकरच महाराष्ट्र पहिल्या क्रमांकोचे ठिकाण म्हणून जागतिक नकाशावर असेल, असा विश्वासही वल्सा नायर सिंग यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्राला भेट देणाऱ्या आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या ४.५ दशलक्ष तर स्थानिक पर्यटकांची संख्या ८.४ दशलक्ष होती.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Maharashtra state has highest tourism potential

Next Story
काँग्रेसकडून गुलाम अलींना मुंबईत आवतण
फोटो गॅलरी