मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांतर्गत असलेल्या महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामार्फत प्राथमिक स्तर (इयत्ता पाचवी) व उच्च प्राथमिक स्तर (इयत्ता आठवी) परीक्षेसाठी नव्याने प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नोंदणी अर्जाची प्रक्रिया ५ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांना ५ ते २१ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ११.५९ पर्यंत ऑनलाइन पद्धतीने नोंदणी अर्ज भरता येईल.

मुक्त विद्यालय मंडळाच्या इयत्ता पाचवी व आठवीच्या परीक्षेसाठी प्रविष्ठ होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना http://msbos.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरता येणार आहे. ऑनलाइन नोंदणी अर्ज भरल्यानंतर विद्यार्थ्यांना २२ ते ३० ऑक्टोबर या कालावधीत मूळ अर्ज, विहित शुल्क व आवश्यक मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या संपर्क केंद्र शाळेत जमा करावी लागणार आहे. त्यानंतर संपर्क केंद्र शाळांनी विद्यार्थ्यांचे अर्ज, विहित शुल्क, मूळ कागदपत्रे तसेच विद्यार्थ्यांची यादी २ नोव्हेंबर रोजी संबंधित विभागीय मंडळाकडे जमा करणे अपेक्षित आहे.

ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या आवश्यक सूचना काळजीपूर्वक वाचाव्या, असे आवाहन मंडळाने विद्यार्थ्यांना केले आहे. सूचनांचा अभ्यास केल्यानंतरच विद्यार्थ्यांनी नोंदणी अर्ज भरण्यास सुरुवात करावी, असे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. इयत्ता पाचवी व आठवीच्या परीक्षेसाठी नव्याने प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदतीचे पालन करून ऑनलाइन नोंदणी पूर्ण करावी, तसेच त्यानंतर आवश्यक मूळ कागदपत्रे व विहित शुल्क संपर्क केंद्र शाळेत जमा करावे, असे मंडळाने कळविले आहे.

अर्ज प्रक्रियेचे वेळापत्रक ऑनलाइन नोंदणी अर्ज भरणे : ५ ते २१ ऑक्टोबर (रात्री ११.५९ पर्यंत) मूळ अर्ज व कागदपत्रे जमा करणे : २२ ते ३० ऑक्टोबर संपर्क केंद्र शाळांकडून विभागीय मंडळाकडे अर्ज जमा करण्याची तारीख : २ नोव्हेंबर २०२६