साध्या, निमआराम, शीतल, यशवंती बस कमी करण्यावर भर

मुंबई : वातानुकूलितपेक्षा सामान्य प्रवाशाला परवडणाऱ्या विनावातानुकूलित सेवेकडे एसटी महामंडळाचे गेल्या चार वर्षांत  दुर्लक्ष झाले आहे. लाल डबा गाडीचे साध्या परिवर्तन बसमध्ये महामंडळाने रूपांतर केले. मात्र ‘परिवर्तन’ होण्याऐवजी या बसची संख्या कमी केली. यापाठोपाठ रातराणी म्हणून ओळख असलेल्या हिरकणी (निमआराम), शीतल, यशवंती बसही कमी होऊन त्याऐवजी वातानुकूलित शिवशाही बसना प्राधान्य देण्यावरच महामंडळाने भर दिला आहे. चार वर्षांत अशा विविध प्रकारच्या एकूण २ हजार ३०० पेक्षा अधिक बस कमी केल्याची माहिती एसटीतील सूत्रांनी दिली.

खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी एसटी महामंडळाने अडीच वर्षांपूर्वी शिवशाही वातानुकूलित बस दाखल केल्या. सध्या यांची संख्या सुमारे एक हजार असून वातानुकूलित शयनयान बस ६६ आहेत. यातील शयनयान बसना प्रतिसाद नसून त्यांचे शयनयान कम आसन बसमध्ये रूपांतर केले जाणार आहे. त्यातच शिवशाही बस या अपघात, उशिराने धावणे, प्रवाशांना न घेताच निघून जाणे यामुळे चर्चेत असतात. तरीही अशा बसची संख्या येत्या काही महिन्यांत आणखी वाढवली जाणार आहे. प्रवाशांचा मिळणारा प्रतिसाद पाहता अवघे ५२ टक्क्यांपर्यंत त्याचे प्रवासी भारमान असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

या बस वाढवण्याकडे विशेष लक्ष दिले जात असतानाच साध्या परिवर्तन, निमआराम, शीतल, यशवंती बसची संख्या मात्र चार वर्षांत कमी होत गेली. तीन व दोनआसनी असलेल्या साध्या लाल रंगाच्या बसचे रूपांतर टू बाय टू परिवर्तन बसमध्ये केले. आसन कमी करतानाच हळूहळू बसची संख्याही कमी केली. १६ हजार ७६७ परिवर्तन बसची संख्या १४ हजार ९९१ पर्यंत पोहोचली आहे. यापाठोपाठ रातराणी म्हणून ओळख असलेल्या हिरकणी निमआराम बसऐवजी महामंडळाने शिवशाही बस चालवण्यावर अधिक भर दिला आहे. निमआराम बसचे प्रवासी भारमान हे ६४ टक्के असून शिवशाहीपेक्षाही अधिक आहे. तरीही रातराणीसाठी शिवशाही बस चालवण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे.

राज्यातील ग्रामीण भागातील कानाकोपऱ्यात जाण्यासाठी मिडी यशवंती बसची सुविधा एसटी महामंडळाने उपलब्ध केली. चार वर्षांपूर्वी ५३७ बसची असलेली संख्याही कमी होऊन २५७ पर्यंत आली. एकीकडे प्रमाणापेक्षा जास्त वातानुकूलित बसची जाहिरातबाजी करत असतानाच दुसरीकडे सामान्य प्रवाशाला परवडणाऱ्या बसच्या सेवेकडे महामंडळाचे दुर्लक्षच होताना दिसत आहे.

एसटी महामंडळाने शीतल नावानेही बस सेवा सुरू केली होती. त्यांची संख्या ११ होती. ती पाचवर आली. तर १३ महानगरपालिकांसाठी सुरू केलेल्या शहरी बस सेवाही ५१६ बसगाडय़ा सुरू केल्या होत्या. आता सात महानगरपालिकांसाठी केवळ ४१६ बसगाडय़ाच धावत आहेत.

मागील वर्षांच्या तुलनेत यंदाच्या वर्षांत एसटीचे तीन कोटी ७१ लाख प्रवासी कमी झाले आहेत. दररोज सरासरी १ लाख प्रवासी संख्या कमी झाली. त्यामुळे दररोजचे ६७ लाख प्रवासी संख्या ६६ लाखांपर्यंत पोहोचली आहे.