मुंबई : राज्यात शालेय व अल्पवयीन विद्यार्थ्यांमध्ये मोबाइलवर ऑनलाईन गेम्स खेळण्याचे प्रमाण वाढत असून याविषयी पालकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. गेम्सचा थेट परिणाम मुलांच्या मानसिक, शैक्षणिक आणि सामाजिक आरोग्यावर होत आहे. शिक्षणासाठी आवश्यक असलेला मोबाइल आज अनेक मुलांसाठी व्यसनाचे साधन ठरत असल्याने मोबाइलमधील गेम्सवर बंदी घालण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांच्याकडे केली आहे.
राज्यात १८ वर्षांखालील सुमारे चार कोटीहून अधिक बालके असून त्यापैकी जवळपास तीन कोटी बालके १५ वर्षांखालील आहेत. ऑनलाइन वर्ग, अभ्यास, माहिती संकलन आदी कारणांसाठी ही मुले मोबाइलचा सर्रास वापर करीत असतात. मात्र, याच मोबाइलचा गैरवापर करून अनेक मुले विविध गेम्समध्ये मोठ्य प्रमाणात गुंतत असल्याचे निदर्शनास येत आहे. लहान वयातच स्क्रीनवरील वाढता वेळ मुलांच्या विकासासाठी घातक ठरत असल्याचे अनेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मोबाइल गेम्सच्या अति वापरामुळे मुलांमध्ये एकाग्रतेचा अभाव, चिडचिडेपणा, झोपेचे विकार, अभ्यासातील घसरण, मानसिक ताणतणाव तसेच व्यसनाधीनतेसारखी गंभीर समस्या वाढत आहे. काही प्रकरणांमध्ये मुलांचे सामाजिक संबंध कमी होत असून मैदानी खेळ, वाचन आणि कुटुंबासोबतचा वेळ देखील कमी होत आहे. हे चित्र केवळ पालकांसाठीच नव्हे, तर देशाच्या भविष्यासाठीही गंभीर असल्याची भावना राज्य शिक्षक परिषदेने व्यक्त केली.
आजची पिढी उद्याची जबाबदार नागरिक असल्याने त्यांच्या सर्वांगीण विकासाकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असे मत अनेक शिक्षकांनी व्यक्त केले. याच पार्श्वभूमीवर, मुलांच्या मानसिक, शैक्षणिक आणि सामाजिक आरोग्यावर घातक परिणाम करणारे मोबाइलवरील ऑनलाइन गेम्स तत्काळ बंद करावेत किंवा त्यावर कठोर निर्बंध आणावेत, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने केली आहे.
तसेच, केवळ बंदी घालणे पुरेसे नसून, मोबाइल गेम्समुळे शैक्षणिक नुकसान झालेल्या विद्यार्थ्यांची ओळख पटवून त्यांच्यासाठी उपचारात्मक शिक्षण आणि समुपदेशनाची व्यवस्था सुरू करावी, अशी मागणी परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी केली.

