Eknath Shinde Birthday: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. “अजित पवार यांच्या निधनाच्या वेदनेतून महाराष्ट्र सावरलेला नाही. मी माझा सहकारी आणि मित्र गमावला आहे”, असा भावना व्यक्त करत शिंदे यांनी वाढदिवस साजरा न करणार नसल्याची माहिती ‘एक्स’वरुन दिली. तसेच, कोणताही सोहळा आयोजित न करण्याचे आवाहन कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना केले आहे.
“महाराष्ट्र सावरलेला नाही”
“राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे साऱ्या महाराष्ट्रावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. यामुळे ०९ फेब्रुवारीला मी वाढदिवस साजरा करणार नाही”, असे एकनाथ शिंदे यांनी एक्सवरुन केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. “अजिदादांच्या अकाली जाण्याच्या वेदनेतून महाराष्ट्र सावरलेला. मी माझा सहकारी आणि मित्र गमावला आहे. अजित पवार यांच्या निधनामुळे झालेली अपरिमित हानी भरुन येणारी नाही”, असेही एकनाथ शिंदे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
सोहळा आयोजित न करण्याचे आवाहन
एकनाथ शिंदे यांनी वाढदिवस साजरा करणार नसल्याचे सांगताना कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना देखील वाढदिवसानिमित्त कोणताही कार्यक्रम, सोहळा आयोजित न करण्याचे आवाहन केले आहे. ‘या दिवशी कार्यकर्ते, पक्षनेते, पदाधिकारी आणि नागरिकांनी पुष्पगुच्छ, भेटी आणू नयेत’, अशी विनंती देखील एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
बारामतीत सांत्वन भेटी
पवार कुटुंबीय गुरुवारपासून सुनेत्रा पवार यांचे निवास्थान असलेल्या सहयोग बंगल्यावर सांत्वनपर भेटीसाठी उपस्थित राहत आहेत. आज (०६ फेब्रुवारी) सांत्वनपर भेटीचा अखेरचा दिवस आहे. जय पवार यांनी इन्स्टाग्रामवर स्टोरीतून ही माहिती दिली आहे. अजित पवार यांचे स्मारक बारामतीत उभारले जाणार आहे. यासाठी शरद पवार आणि पार्थ व जय पवार यांच्या गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु आहेत.
सुनेत्रा पवार मंगळवारी उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारणार
सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर येत्या मंगळवारी (१० फेब्रुवारी) त्या पदभार स्वीकारतील. पदभार स्वीकारल्यानंतर त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला देखील हजेरी लावतील अशी माहिती आहे.

