मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण व्हावा, त्यांना विज्ञानाची गोडी लागावी यासाठी शालेय शिक्षण विभागातर्फे दरवर्षी राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. या प्रदर्शनामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पारितोषिकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ५१ विद्यार्थ्यांना अमेरिकेच्या ‘नासा’ केंद्राला भेट देता येणार आहे. ‘मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी’ उपक्रमांतर्गत या विद्यार्थ्यांना अमेरिकेला पाठविण्यात येणार असून, त्यासाठी राज्य सरकारने ३ कोटी ३० लाख रुपये निधी मंजूर केला आहे.

राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागातर्फे दरवर्षी तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावर विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. या प्रदर्शनांसाठी राज्यातील लाखभर शाळांमधील विद्यार्थी विविध प्रकल्प सादर करतात. या प्रकल्पांची तालुका, जिल्हास्तरावर निवड होऊन मग ते राज्य स्तरावरील प्रदर्शनांमध्ये समाविष्ट केले जातात. या तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावर सर्वोत्कृष्ट ठरणाऱ्या प्रकल्पांसाठी आता ‘मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी’ हा उपक्रम राबवला जाणार आहे.

राज्यातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या विज्ञान संस्थांचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा, वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित व्हावा आणि संशोधन क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रेरणा मिळावी, यासाठी ‘मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी’ हा उपक्रम राज्य सरकारने सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत राज्य स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना नासाची वारी करण्याची संधी उपलब्ध करण्यात येणार आहे. त्यानुसार यंदा राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात उत्कृष्ट कामगिरी करणारे ५१ विद्यार्थी, १ शिक्षक, १ शिक्षिका, तसेच २ प्रशासकीय अधिकारी, समन्वयकांचा समावेश आहे. या सर्वांच्या परदेश दौऱ्यासाठी विमान प्रवास, व्हिसा, निवास व स्थानिक प्रवास खर्चासह प्रतिव्यक्ती ६ लाख रुपये इतका खर्च अपेक्षित असून एकूण ३ कोटी ३० लाख रुपयांच्या खर्चास मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील ५१ विद्यार्थ्यांचे अमेरिकेतील ‘नासा’ केंद्राला भेट देण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

विद्यार्थ्यांना ‘इस्रो’लाही भेट देता येणार

राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबरच जिल्हास्तरावर निवड झालेल्या १८० विद्यार्थी व ८ शिक्षकांना बंगळुरू येथील भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला (इस्रो) ‘मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी’ उपक्रमांतर्गत भेट देता येणार आहे. तसेच तालुकास्तरावर निवड झालेल्या २१ विद्यार्थ्यांच्या गटांना जवळच्या विज्ञान केंद्रांना भेट देता येणार आहे. यामध्ये नागपूरमधील रमन विज्ञान केंद्र, पिंपरी – चिंचवड विज्ञान केंद्र, मुंबईतील नेहरू तारांगण आणि जवळपासच्या विज्ञान केंद्राला भेट देण्याची संधी मिळणार आहे. तालुकास्तरावरील जवळपास २ हजार १४८ विद्यार्थी व २० पर्यवेक्षकांना ही संधी मिळणार आहे. तालुका व जिल्हास्तरावरील या सर्व उपक्रमांसाठी जिल्हा नियोजन समितीअंतर्गत निधी उपलब्ध करण्यात येणार आहे.