मुंबई : साखर खरेदी दर ३८ रुपयांपेक्षा जास्त राहिल्यास इथेनॉल उत्पादन करणे आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य ठरत नाही. साखरेचे खरेदी दर पुढील वर्षभर ४० ते ४५ रुपयांदरम्यान राहण्याची शक्यता असल्यामुळे यंदाच्या हंगामात साखर कारखान्यांमधून इथेनॉल निर्मिती होण्याची शक्यता नाही. परिणामी ३५ हजार कोटी रुपयांहून जास्त आर्थिक गुंतवणूक होऊन ३५० कोटी लिटर उत्पादन क्षमता निर्माण झालेल्या इथेनॉल उद्योगाला वर्षभर टाळे लागण्याची भीती निर्माण झाली आहे.
एल – निनोमुळे भारतासह दक्षिण आशिया, आग्नेय आशिया आणि प्रमुख साखर उत्पादक असलेल्या ब्राझीलमध्ये साखर उत्पादनात घट होण्याचा अंदाज आहे. सध्या जागतिक बाजारात साखरेची टंचाई जाणवत आहे. पुढील हंगामात उत्पादनात घट होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे जागतिक बाजारात साखरेचे दर चढे राहण्याची शक्यता आहे. साखरेचा खरेदी दर सरासरी ४० ते ४५ रुपये प्रति किलो राहण्याचा अंदाज आहे. देशात आणि प्रामुख्याने महाराष्ट्रात गाळपासाठी उसाचा तुटवडा भासण्याची शक्यता असल्यामुळे केंद्र सरकारकडून साखर उत्पादनाला प्राधान्य दिले जाणार आहे.
सध्याच्या इथेनॉल खरेदी दराचा विचार करता, कारखान्यांकडून होणाऱ्या साखर खरेदीचा दर ३५ ते ३९ रुपये प्रति किलो दरम्यान राहिल्यास इथेनॉल उत्पादीत करणे फायदेशीर ठरते. पण, साखरेचा खरेदी दर ४० रुपयांहून जास्त राहिल्यास इथेनॉल उत्पादन करणे आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य ठरत नाही. त्यामुळे कारखान्यांकडून साखर, साखरेचा पाक, उसाचा रस आदींपासून इथेनॉल उत्पादन केले जाणार नाही.
राज्यातील खासगी, सहकारी साखर कारखान्यांनी इथेनॉल प्रकल्पांसाठी सुमारे ३५ हजार कोटी रुपयांची आर्थिक गुंतवणूक केली आहे. साखर कारखान्यांच्या इथेनॉल प्रकल्पांना केंद्र सरकारने व्याज अनुदान दिले होते, सहा टक्क्यांवरील व्याज माफी केंद्र सरकारकडून मिळत होती. केंद्र सरकारने प्रोत्साहन दिल्यामुळे पाच – सहा वर्षांत राज्यातील कारखान्यांची इथेनॉल उत्पादन क्षमता वार्षिक ३५० कोटी लिटरवर गेली आहे. पण, आता इथेनॉल उत्पादन करणे आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य ठरणार नसल्यामुळे यंदा इथेनॉल प्रकल्प बंद राहण्याची शक्यता आहे. परिणामी किमान वर्षभर तरी बहुतांशी इथेनॉल प्रकल्पाला टाळे लागण्याची भीती निर्माण झाली आहे.
धान्य आधारित इथेनॉल उद्योगालाही फटका
बिहार, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, पंजाब, हरियाणा आदी राज्यांमध्ये मका, तांदूळ आधारित इथेनॉल प्रकल्पांची संख्या मोठी आहे. देशात तयार झालेल्या इथेनॉल विरोधी वातावरणामुळे धान्य आधारित उद्योगही अडचणीत आले आहेत. तेल कंपन्यांनी इथेनॉल खरेदी थांबविल्यामुळे प्रकल्प १२ महिने चालविणे कठीण जात आहे. त्यासह धान्य खरेदीपासून विक्री पर्यंतची साखळीही अडचणीत आली आहे. परिणामी धान्य आधारित इथेनॉल उद्योगावर काळे ढग निर्माण झाले आहेत.
इथेनॉल निर्मिती ठप्प राहणार
साखर खरेदीचा दर ४० रुपयांवर गेल्यास कारखाने इथेनॉल उत्पादीत करणार नाहीत. केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीला परवानगी दिली तरीही इथेनॉल उत्पादन करणे आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य ठरणार नाही. किमान वर्षभर इथेनॉल निर्मिती ठप्प राहण्याची शक्यता आहे. संपूर्ण इथेनॉल उद्योग आणि त्यासाठीची मोठी आर्थिक गुंतवणूक अडचणीत आली आहे. केंद्र सरकारने इथेनॉल उद्योगासाठी सर्वसमावेश धोरण निश्चित करण्याची गरज आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांनी दिली.
