मुंबई : राज्यातील उसाचा गाळप हंगाम अखेरच्या टप्प्यात आला आहे. २४ मार्चपर्यंत ९८ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. यंदा १२० कारखान्यांनी गाळप पूर्ण केले आहे. उर्वरित कारखान्यांचा हंगाम एप्रिल मध्यापर्यंत पूर्ण होऊन १०० लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज आहे.

साखर आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार यंदाच्या १०३ सहकारी व १०७ खासगी, असे एकूण २१० साखर कारखाने सुरू झाले होते. सुरुवातीला पडलेली चांगली थंडी आणि चांगल्या नियोजनामुळे गाळप जोमाने सुरू झाले होते. त्यामुळे आतापर्यंत १०४२.८८ लाख टन ऊस गाळप झाला आहे. त्यातून ९८.८३ लाख टन साखरेचे उत्पादन झाले असून, साखर उतारा ९.४८ टक्के नोंदवला गेला आहे. मागील हंगामाच्या तुलनेत साखर उत्पादनात वाढ झाली आहे. मागील वर्षी याच कालावधीत ८५०.१६ लाख टन ऊस गाळप होऊन ८०.३६ लाख टन साखर उत्पादन झाले होते, तर उतारा ९.४५ टक्के मिळाला होता.

कोल्हापूर विभाग आघाडीवर

विभागनिहाय आकडेवारीत कोल्हापूर विभाग आघाडीवर आहे. २१०.४६ लाख टन ऊस गाळप होऊन २३.१९ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. साखर उतारा ११.०२ टक्के इतका सर्वाधिक आहे. पुणे व सोलापूर विभागाची कामगिरी चांगली आहे. पुणे विभागात २२४.९९ लाख टन ऊस गाळप करून २२.१८ लाख टन साखर उत्पादन झाले असून, उतारा ९.८६ टक्के मिळाला आहे.

सोलापूर विभागात २२०.९ लाख टन ऊस गाळप होऊन १८.९८ लाख टन साखर उत्पादन झाले असून, उतारा ८.६ टक्के आहे. राज्यातील २१० सुरू कारखान्यांपैकी १८३ कारखान्यांनी गाळप बंद केले आहे. उर्वरित कारखान्यांमध्ये गाळप सुरू आहे. एप्रिल मध्यापर्यंत गाळप पूर्ण होऊन एकूण साखर उत्पादन १०० लाख टनांवर जाण्याची शक्यता आहे.