मुंबई : आगामी ऊस गाळप हंगाम २०२६ – २७ सुरू करण्यासाठी राज्यातील साखर कारखान्यांना गाळप परवाना घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. कारखान्यांनी ३० सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करावयाचा आहे. गाळप परवाना प्राप्त केल्याशिवाय कोणत्याही कारखान्याला गाळप हंगाम सुरू करता येणार नाही. दरम्यान, साखरेच्या तुटवड्यामुळे हंगाम लवकर सुरू करण्याची सरकारी पातळीवर लगबग सुरू झाली असली तरीही दिवाळीनंतरच हंगामाला गती येणार आहे.
पुणे येथील साखर आयुक्तालयाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार ऊस गाळप हंगाम २०२५-२६ च्या ऊस गाळप हंगामाचा आढावा तसेच सन २०२६-२७ मधील गाळप हंगामाबाबत मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील मंत्री समितीच्या बैठकीत निर्णय होणार आहे. या निर्णयानंतर गाळप हंगाम सुरू करण्याची तारीख निश्चित केली जाणार आहे. त्यापूर्वी सर्व साखर कारखान्यांनी गाळप परवान्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.
साखर कारखान्यांनी गाळप परवान्यासाठी ऑनलाइन अर्ज १ सप्टेंबरपासून सादर करायचा आहे. त्यासाठी साखर आयुक्तालयाने उपलब्ध करून दिलेल्या ऑनलाइन प्रणालीचा वापर करावा लागणार आहे. अर्ज सादर करण्यासाठी कारखान्यांना लॉगिन आयडी आणि पासवर्डचा वापर करून संबंधित ऑनलाइन संकेतस्थळावर माहिती भरावी लागेल. अर्जाची प्रक्रिया आणि आवश्यक माहिती या बाबतची कार्यपद्धती या पूर्वीच सर्व कारखान्यांना पाठविण्यात आली आहे. गाळप परवाना अर्ज सादर करण्यासाठी २ सप्टेंबर २०२६ ते ३० सप्टेंबर २०२६ हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.
प्रादेशिक सहसंचालक साखर यांच्याकडून छाननी केल्यानंतर कारखान्याने अर्ज सादर केल्यापासून सात दिवसांत प्रस्ताव साखर आयुक्तालयाकडे पाठविण्याची प्रक्रिया आहे. साखर आयुक्तालय स्तरावर छाननी पूर्ण झाल्यानंतर सात दिवसांत ऑनलाइन गाळप परवाना वितरित करण्याचे नियोजन आहे. गाळप परवाना न घेताच गाळप सुरू केल्यास संबंधित कारखान्यांवर कारवाई केली जाऊ शकते.
सण – उत्सवामुळे दिवाळीनंतरच गती येणार
देशात साखरेचा तुटवडा असल्यामुळे केंद्र सरकार ऑक्टोंबरपासून हंगाम सुरू करण्याच्या विचारात आहे. राज्यात परवाना देण्याची प्रक्रिया नियोजित वेळेनुसारच सुरू आहे. १५ ऑक्टोंबरपासून गाळपाच्या सूचना दिल्या तरीही दसरा २० ऑक्टोंबर रोजी आहे. दसरा झाल्याशिवाय ऊसतोडणी मजूर कामावर येत नाही. त्यानंतर दिवाळी पाच नोव्हेंबरपासून सुरू होते. त्यामुळे हंगामाला गती येण्यास १५ नोव्हेंबर उजाडणार. माघारी मोसमी पाऊस लांबल्यास हंगाम आणखी लांबेल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी कारखाना संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांनी दिली.
