मुंबई : राज्याचा यंदाचा उसाचा गाळप हंगाम १५ ऑक्टोंबरपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पण, देशात साखरेची टंचाई असल्यामुळे १५ ऑक्टोंबर पूर्वी किंवा त्यानंतरही हंगाम सुरू करता येईल. गाळप हंगाम सुरू करण्याविषयी कोणतीही सक्ती नाही, असे साखर आयुक्त संजय कोलते यांनी काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ९ सप्टेंबर रोजी झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत १५ ऑक्टोंबरपासून कारखाने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण, पुरेसा पाऊस झाला नाही. त्यामुळे उसाची वाढ योग्य प्रकारे झाली नाही, उसात पुरेशी साखर भरली नाही, त्यामुळे उसाच्या वजनात आणि साखर उताऱ्यात घट होऊन शेतकरी आणि कारखानदारांचे नुकसान होईल. त्यामुळे कारखाने नोव्हेंबरपासून सुरू करण्याची मागणी कारखानदारांनी केली होती.
या पार्श्वभूमीवर साखर आयुक्तांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात ज्या साखर कारखान्यांनी गाळप परवाना मिळविण्यासाठी आवश्यक असलेली सर्व कायदेशीर व प्रशासकीय पूर्तता पूर्ण केली आहे, असे कारखाने १५ ऑक्टोबरपासून किंवा त्यापूर्वी गाळप सुरू करू शकतील. शासनाच्या वतीने कोणत्याही साखर कारखान्याला गाळप हंगाम लवकर सुरू करण्याची सक्ती नाही. १५ ऑक्टोबरपूर्वी गाळप परवान्यासाठी अर्ज करणाऱ्या कारखान्यांना गाळप परवाना देण्यात येईल. फक्त सर्व साखर कारखान्यांना गाळप सुरू करण्यापूर्वी साखर आयुक्त कार्यालयाकडून अधिकृत गाळप परवाना घ्यावा लागेल. असेही पत्रकात म्हटले आहे.
सण – उत्सवामुळे दिवाळीनंतरच गती येणार ?
देशात साखरेचा तुटवडा असल्यामुळे केंद्र सरकार ऑक्टोंबरपासून हंगाम सुरू करण्याच्या तयारीत आहे. राज्य सरकारही त्यासाठी प्रयत्नशील आहे, १५ ऑक्टोंबरपासून किंवा त्यापूर्वी गाळपाच्या सूचना दिल्या आहेत. पण, दसरा २० ऑक्टोंबर रोजी आहे. दसरा झाल्याशिवाय ऊसतोडणी मजूर कामावर येत नाहीत. शिवाय त्यानंतर दिवाळी पाच नोव्हेंबरपासून सुरू होते. त्यामुळे गाळप हंगामाला गती येण्यास १५ नोव्हेंबर उजाडण्याची शक्यता आहे.
निर्णयाचे आम्ही स्वागत करतो
गाळप हंगाम सुरू करण्याबाबत कारखान्यांना मोकळीक दिली ही अत्यंत चागंली बाब आहे. उसाची उपलब्धता, कामगारांची उपलब्धता पाहून कारखान्यांना निर्णय घेता येईल. साखर आयुक्तांच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो, असे मत महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांनी व्यक्त केले.
