मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यातील कमाल तापमानात चढ-उतार होत असून मार्च महिन्यासह यंदाचा उन्हाळाही अधिक तीव्र असेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. हवामान विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूपानुसार यंदाच्या उन्हाळ्यात मध्य भारतासह राज्यातील कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. तसेच काही भागात उष्णतेच्या लाटांचीही शक्यता आहे.

यावर्षी फेब्रुवारीच्या सुरुवातीपासूनच राज्यात उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. मागील आठवड्यात विदर्भासह काही भागांमध्ये पावसाची नोंद झाली होती. यामुळे राज्यातील हवामानात झपाट्याने बदल होत असून यंदाचा उन्हाळा अधिक तीव्र असेल असा अंदाज हवामान तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. कोकण पट्ट्यात तुलनेने मध्यम ते उष्ण स्वरूपाचे तापमान राहण्याची शक्यता असून मराठवाडा विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात उष्णतेची तीव्रता अधिक जाणवू शकते, अशी शक्यता हवामान तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. तसेच काही हवामान अभ्यासकांनी पुढील काही महिन्यात ‘एल निनो’ विकसित होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

मार्चच्या पहिल्याच आठवड्यात राज्यातील कमाल तापमानात २ ते ३ अंशांनी वाढ होईल अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. यामुळे राज्यातील अनेक भागातील उकाड्यात वाढ होण्याची शक्यता आहे. मंगळवारी विदर्भात हवामान विभागाच्या सर्वच केंद्रात पारा ३५ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक नोंदला गेला. त्यात अकोला येथे सलग दुसऱ्या दिवशी राज्यातील सर्वाधिक म्हणजे ३८.६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. तर वर्धा – ३८.५, अमरावती ३८.४, ब्रम्हपुरी ३७.२, चंद्रपूर ३७.५, नागपूर ३६.२ अंश सेल्सिअस इतके होते. मध्य महाराष्ट्रातही कमाल तापमानात वाढ झाली आहे. सोलापूर येथील कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस तर नाशिक – ३५.२, पुणे – ३५. ५, जळगाव – ३७.२, कोल्हापूर ३४.९ तर सातारा येथील कमाल तापमान ३५.९ अंश सेल्सिअस इतके होते. तर मराठवाड्यात धाराशिव – ३५.७, छत्रपती संभाजीनगर ३६.२ तर परभणी येथील कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस इतके होते.

मुंबईतही उकाडा वाढणार

मुंबईसह कोकणातील काही भागात सध्या उष्ण आणि दमट वातावरण कायम आहे यामुळे या पट्ट्यातील पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड आदी भागांना दोन दिवस हवामान विभागाकडून ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. मंगळवारी हवामान केंद्राच्या सांताक्रूझ केंद्रात ३३.७ अंश सेल्सिअस तर कुलाबा केंद्रात ३० अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. तर रत्नागिरी – ३४.५ आणि डहाणू येथील कमाल तापमान ३१.८ अंश सेल्सिअस इतके होते. दरम्यान, बुधवारपासून मुंबईतील उकाड्यात वाढ होणार असून कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २२ अंश सेल्सिअस इतके राहील, असा अंदाज हवामान विभाकडून व्यक्त करण्यात आला आहे.