मुंबई : राज्यातील महायुती सरकारने नव्या उद्योग धोरणाच्या माध्यमातून जगभरातील उद्योगांना राज्यात गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहन आणि सवलतींचा वर्षाव केला असून यंदाच्या दावोस आंतरराष्ट्रीय गुंतवणूक परिषदेच्या माध्यमातून राज्यात किमान २० लाख कोटींची थेट परदेशी गुंतवणूक आणण्याचा निर्धार सरकारने केला आहे. उद्योग विभागाने दावोस गुंतवणूक परिषदेत होणाऱ्या करारांचे नियोजन केले असून यंदा राज्यात विक्रमी गुंतवणूक येईल, अशी माहिती उद्योग विभागातील उच्चाधिकाऱ्याने दिली.

दावोस येथे यंदा १९ ते २३ जानेवारी दरम्यान आंतरराष्ट्रीय गुंतवणूक परिषद होणार आहे. या परिषदेत जगभरातील गुंतवणूकदार आणि देश, राज्ये सहभागी होत असतात. राष्ट्रीय सकल देशांतर्गत उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा १३.६ टक्केपेक्षा अधिक असून, राज्याने २०३० पर्यंत एक लाख कोटी डाॅलरची अर्थव्यवस्था बनण्याचा निर्धार केलेला आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये देशातील थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्राचा सर्वाधिक ३१ टक्के वाटा असून, यातून राज्याची गतिमान आणि गुंतवणूकदार अनुकूल आर्थिक परिस्थिती समोर येते.

दावोस आंतराष्ट्रीय गुंतवणूक परिषदेच्या माध्यमातून राज्यात अधिकाधिक थेट परदेशी गुंतवणूक आणण्यास मदत होत असून गेल्या वर्षी दावोस परिषदेच्या माध्यमातून राज्यात विक्रमी अशी १५ लाख कोटींची गुंतवणूक आणण्यात सरकारला यश आले होते. यंदा त्यापेक्षा अधिक थेट परदेशी गुंतवणूक आणण्याचा निर्धार सरकाने केला असून यंदा २० लाख कोटींपेक्षा अधिकची गुंतवणूक आणण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती उद्योग विभागातील सूत्रांनी दिली.

डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे बंधने

यंदा दोवास परिषदेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सहभागी होणार आहेत. त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेवर पडणारा ताण लक्षात घेऊन प्रत्येक देशांनी छोटी शिष्टमंडळे पाठविण्याची विनंती आयोजकांनी केली आहे. राज्यातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात दावोसला जाणाऱ्या शिष्टमंडळात उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह मुख्यमंत्री सचिवालय, उद्योग विभाग आणि औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी सहभागी होणार असल्याचे समजते.