मुंबई : ‘शाळा बंद’ आंदोलनामध्ये सहभागी होणाऱ्या शिक्षकांचे वेतन कापण्याचे आदेश शिक्षण संचालनालयाने दिल्यानंतरही आपल्या भूमिकेवर ठाम राहिलेले शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले. आझाद मैदानातील आंदोलनात पाच हजारांहून अधिक शिक्षक सहभागी झाल्याचा दावा शिक्षक संघटनांकडून करण्यात आला. शालेय शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार या आंदोलनामध्ये ८ हजार ६०० शिक्षक सहभागी झाले असून, या शिक्षकांचे एक दिवसाचे वेतन कापण्याची कारवाई होण्याची शक्यता आहे.

शिक्षण विभागाचे आदेश झुगारून अनेक शिक्षकांनी ‘वेतन कापले तरी आता माघार नाही’, अशी भूमिका घेत गुरुवारी आझाद मैदानामध्ये आपल्या विविध मागण्यांसाठी धडक दिली होती. आंदोलनामध्ये सहभागी होणाऱ्या शिक्षकांची माहिती संकलित करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता. त्यानुसार विभागीय शिक्षण उपसंचालक, जिल्हा शिक्षणाधिकारी आणि मुंबईतील शिक्षण निरीक्षकांना माहिती संकलित करण्याचे आदेश दिले.

शालेय शिक्षण विभागाच्या सादर केलेल्या अहवालानुसार राज्यातील २४ हजार ६९३ माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांपैकी २२ हजार ९१० शाळांमध्ये नियमित अध्यापन सुरू होते, तर १ हजार ४६६ शाळा बंद राहिल्या. तसेच २ लाख ७२ हजार ९७ शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी शाळांमध्ये उपस्थित होते. ८० कर्मचारी रजेवर असल्याची नोंद करण्यात आली. अनुपस्थित कर्मचाऱ्यांची उपस्थिती आणि रजेची पडताळणी करून संबंधितांवर कारवाई करण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

नागपूर आणि कोल्हापूर विभागात आंदोलनाचा परिणाम तुलनेने अधिक जाणवला, मात्र पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लातूर आणि अमरावती विभागातील बहुतांश शाळांमध्ये नियमित कामकाज सुरू होते. पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यात अतिवृष्टीमुळे आपत्ती व्यवस्थापन विभागाने जाहीर केलेल्या १९० शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. काही जिल्ह्यांत शिक्षकांनी काळ्या फिती लावून शाळेत उपस्थित राहून आंदोलनाला प्रतीकात्मक पाठिंबा दिल्याची नोंदही अहवालात करण्यात आली आहे.

एकूण माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा : २४,६९३

सुरू असलेल्या शाळा : २२,९१०

बंद राहिलेल्या शाळा : १,४६६

आंदोलनात सहभागी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी : ८,६००

उपस्थित शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी : २,७२,०९७ कर्मचारी रजेवर : ८०

सर्वाधिक शिक्षक सहभागी

नागपूर २,५४६

कोल्हापूर २७३९ सोलापूर ९६३

पालघर ६४२

सातारा ४४०

वर्धा ४१३

सांगली २३६

हिंगोली २२०

धाराशिव १९८

अहिल्यानगर ५५