मुंबई : राज्यात काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षा होत असल्याचे प्रकार उघडकीस येत आहे. याबाबत समाजात गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य, सुरक्षित वातावरण आणि शिक्षक–विद्यार्थी नातेसंबंध अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने शालेय शिक्षण विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील सर्व जिल्हे, तालुके आणि केंद्रस्तरावरील शिक्षण परिषदांमध्ये ‘सकारात्मक शिस्त’ या विषयावर किमान ४५ मिनिटांचे विशेष सत्र आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हे सत्र डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात येणार आहे.
‘सकारात्मक शिस्त’ या मार्गदर्शन सत्रामध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा केली जाणार आहे. त्यामध्ये शारीरिक शिक्षेबाबत शिक्षण अधिकार अधिनियमातील तरतुदी व शिक्षकांची जबाबदारी, शिक्षेचे प्रकार व स्वरूप, शिक्षेचे परिणाम, शिक्षेचा मनावर व मेंदूवर होणारा परिणाम, विविध शैक्षणिक विचारवंत व त्यांचे सकारात्मक शिस्तीचे विचार, सकारात्मक शिस्त तत्वे व त्यांची अंमलबजावणी, संवाद सहकार्य व समुपदेशन यावर आधारित वर्ग व्यवस्थापन, योग्य शिस्तीचे मार्ग, सकारात्मक शिस्तीचे तंत्र व उपक्रम आदी मुद्द्यांच्या अनुषंगाने या शिक्षण परिषदेमध्ये मार्गदर्शन केले जाणार आहे.
शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या मार्गदर्शनानुसार शालेय शिक्षण विभागाने नुकतेच डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सकारात्मक शिस्त याविषयी शिक्षण परिषदेचे आयोजन करण्याचे निर्देश अधिकार्यांना दिले. “शिस्त ही भीतीतून नाही तर विश्वासातून निर्माण झाली पाहिजे. सकारात्मक शिस्त हीच मुलांच्या उज्ज्वल भविष्याची खरी पायाभरणी आहे.” अशी सूचना दादा भुसे यांनी यावेळी केली.

