मुंबई : अभियांत्रिकी-तंत्रज्ञान, व्यवस्थापनासह विविध पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या जागांमध्ये यंदा मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) मंजूर केलेल्या संस्थांमध्ये खासगी स्वयंअर्थसहाय्यित संस्थांना मोठी मुभा दिली असून यामुळे राज्यातील प्रवेशक्षमतेत २०२५-२६च्या तुलनेत २०२६-२७ मध्ये ९.८४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तंत्रशिक्षणातील जागांमध्ये तब्बल ४२ हजार ७१६ जागांची वाढ झाली आहे.

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने मान्यता दिलेल्या संस्थांची जागांसह माहिती संकेतस्थळावर दिली आहे. राज्यातील एआयसीटीईमान्य अभ्यासक्रमांच्या जागांत मोठी वाढ झाली आहे. २०२५-२६ मध्ये ४ लाख ३४ हजार २८५ इतक्या जागांमध्ये वाढ होऊन २०२६-२७ मध्ये त्या ४ लाख ७७ हजार १ झाल्या आहेत. त्यामुळे एका वर्षात विविध संस्थांमध्ये ४२ हजार ७१६ जागांची भर पडली आहे.

वाढलेल्या जागांमध्ये अभियांत्रिकी व तंत्रज्ञान अभ्यासक्रमांचा वाटा सर्वाधिक असून, या अभ्यासक्रमांच्या जागा ३ लाख ३९ हजार ६७ वरून ३ लाख ६९ हजार ११० इतक्या झाल्या आहेत. यात ३० हजार ४३ जागांची वाढ झाली आहे. शिवाय, व्यवस्थापन अभ्यासक्रमांच्या जागांमध्ये ६ हजार ८३६, तर इतर अभ्यासक्रमांच्या प्रवेशक्षमतेत ५ हजार ८३७ जागांची वाढ झाली आहे. व्यवस्थापन अभ्यासक्रमांची क्षमता ७१ हजार २०२ वरून ७८ हजार ३८, तर इतर अभ्यासक्रमांची क्षमता २४ हजार १६ वरून २९ हजार ८५३ वर पोहोचली आहे.

खासगी संस्थांनी मोठ्या प्रमाणात नव्या महाविद्यालयासह तुकड्यांना मान्यता घेतल्याने स्वयंअर्थसहाय्यित संस्थांच्या प्रवेशक्षमतेत सर्वाधिक वाढ झाली आहे. गेल्यावर्षी अशा संस्थांमध्ये ३ लाख ६७ हजार ९८७ जागा होत्या, यंदा वाढ होऊन त्या ४ लाख १० हजार ९५० इतक्या झाल्या आहेत. यात ४२ हजार ९६३ जागांची वाढ झाली आहे. दुसरीकडे, शासनाच्या संस्थांच्या प्रवेशक्षमतेत केवळ नव्या अभ्यासक्रमांच्या ६१५ जागांचीच वाढ झाली आहे. सरकारी संस्थांत असलेल्या जागा ३४ हजार २२३ वरून ३४ हजार ८३८ इतक्या झाल्या आहेत.

पदवी-पदविका अभ्यासक्रमांच्या जागांमध्येही वाढ

पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशक्षमतेत १४ हजार ३३० जागांची वाढ झाली आहे. २०२५-२६ मध्ये १ लाख ९४ हजार २९ असलेली क्षमता यंदा २ लाख ८ हजार ३५९ झाली आहे. पदविका अभ्यासक्रमांच्या जागा १ लाख ३४ हजार ७५५ वरून १ लाख ४९ हजार १५७ झाल्या असून, त्यात १४ हजार ४०२ जागांची वाढ झाली आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशक्षमतेतही १३ हजार ७१९ जागांची भर पडली आहे. या अभ्यासक्रमांची क्षमता ९० हजार ३०३ वरून १ लाख ४ हजार २२ झाली आहे. पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमांच्या जागांमध्ये ३२५ ने वाढ झाली आहे. मात्र, पदव्युत्तर प्रमाणपत्र अभ्यासक्रमांच्या जागा ५८० वरून ५२० झाल्याने ६० जागांची घट झाली आहे. पदविका-पश्चात अभ्यासक्रमांच्या ३० व फेलोशिपच्या १९० जागांमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

एआयसीटीईकडून मंजूर झालेल्या जागांची तुलना

अभ्यासक्रम — २०२५-२६ — २०२६-२७ — वाढ/घट

पदवी — १,९४,०२९ — २,०८,३५९ —

१४,३३०

पदविका — १,३४,७५५ — १,४९,१५७ —

१४,४०२

पदव्युत्तर पदविका — १४,३९८ — १४,७२३ —

३२५

पदव्युत्तर प्रमाणपत्र —५८० — ५२० — -६०

पदव्युत्तर — ९०,३०३ — १,०४,०२२ —

१३,७१९

फेलोशिप — १९० — १९० — ०

एकूण — ४,३४,२८५ — ४,७७,००१ —

४२,७१६

अभ्यासक्रम

— २०२५-२६ — २०२६-२७ — वाढ/घट

अभियांत्रिकी व तंत्रज्ञान —३,३९,०६७ — ३,६९,११० —

३०,०४३ व्यवस्थापन — ७१,२०२ — ७८,०३८ —

६,८३६ इतर

—२४,०१६ — २९,८५३ —

५,८३७

एकूण — ४,३४,२८५ — ४,७७,००१ —

४२,७१६