तापमान घसरले, मात्र झळा वाढणार

न्हाळ्याच्या सुरुवातीपासून सुरू झालेल्या अवकाळी पावसाचा आणखी एक तडाखा विदर्भातील शेतकऱ्यांना बसत आहे.

उत्तर भारतात सुरू झालेला पाऊस आणि मध्य महाराष्ट्रावर असलेला कमी दाबाचा पट्टा यामुळे पुन्हा एकदा विदर्भ व मराठवाडय़ात अवकाळी पाऊस सुरू झाला आहे. मराठवाडय़ातील पाऊस दोन दिवसांत कमी होणार असला तरी विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी सुरूच राहणार असल्याचा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे. वाऱ्यांची दिशा उत्तरेकडून असल्याने मुंबईसह राज्यातील अनेक ठिकाणच्या कमाल तापमानात घट झाली आहे. मात्र, तापमानातील घट तात्पुरती असून रविवारपासून पुन्हा उन्हाच्या झळा बसण्यास सुरुवात होईल.

उन्हाळ्याच्या सुरुवातीपासून सुरू झालेल्या अवकाळी पावसाचा आणखी एक तडाखा विदर्भातील शेतकऱ्यांना बसत आहे. उत्तर भारतात आलेल्या पश्चिमी वाऱ्यांमुळे हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, छत्तीसगढ, बिहार, झारखंड या राज्यांमध्ये पाऊस पडत आहे. मध्य प्रदेश ते महाराष्ट्रादरम्यान असलेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे विदर्भातही पावसाच्या सरी आल्या आहेत. वाऱ्यांची दिशा उत्तरेकडून असल्याने पुढील दोन दिवसांत पावसाचा जोर पश्चिम बंगाल, ओदिशा व आंध्र प्रदेशमध्ये वाढेल. विदर्भातही पुढील किमान पाच दिवस पावसाच्या सरी व गारपीट होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडय़ातही रविवारी, सोमवारी काही तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी येतील. १६ मार्चपासून पुन्हा एकदा पश्चिमी वारे उत्तर भारतात सुरू होतील. त्यामुळे अवकाळी पावसाचा जोर त्यानंतर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. हवामानाच्या या स्थितीमुळे मुंबईतही ढगाळ वातावरण आहे. शुक्रवारी मुंबईचा पारा ३६.५ अंश से. वर गेला होता. मात्र शुक्रवारी रात्रीपासून वाऱ्यांची दिशा उत्तरेकडून झाली. उत्तरेत पावसामुळे निर्माण झालेला गारवा या वाऱ्यांसोबत राज्यापर्यंत पोहोचला. यामुळे मुंबईचे तापमानही शनिवारी तब्बल पाच अंश से. ने घसरले. शनिवारी सांताक्रूझ येथे ३१.८ अंश से. तापमानाची नोंद झाली. अर्थात रविवारी तापमानात वाढ होणार असल्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे.

सोलापुरात पारा ४० वर

सोलापुरात तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेला असून सातत्याने तापमानाचा पारा वाढत चालला आहे. शुक्रवारी सोलापूरचे तापमान ४०.७ अंश सेल्सियस इतके होते. तर शनिवारी ४०.१ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. दहा दिवसांपूर्वी पारा ४० च्या घरात गेला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Maharashtra temperature news