मुंबई : पश्चिम आशियामध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे भारताची वस्त्रोद्योग उत्पादनांची निर्यात ठप्प झाली असून कापूस आणि सूत या कच्चा मालाचे दर वाढल्याने आठवड्यातील तीन दिवस या व्यवसायात टाळेबंदी आली आहे. त्यामुळे या व्यवसायाला वाचवण्यासाठी राज्यातील महायुती सरकारने विशेष आर्थिक पॅकेज द्यावे, अशी मागणी भिवंडी पूर्वचे समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी केली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांना वस्त्रोद्योग व्यवसायाला तातडीने विशेष आर्थिक पॅकेजे देण्यसंदर्भात आमदार रईस शेख यांनी नुकतेच पत्र लिहिले आहे.

यासंदर्भात बोलताना आमदार रईस शेख म्हणाले की, मार्च २०२६ या एका महिन्यात राज्यातील वस्त्रोद्योग व्यवसायाला तब्बल ४ हजार कोटींचा फटका बसल्याचे राज्य वस्त्रोद्योग महामंडळाने केलेल्या पाहणीतून स्पष्ट झाले आहे. राज्यात ९ लाख ४८ हजार यंत्रमाग आणि ४ हजार हातमाग आहेत. देशातील यंत्रमागापैकी ३९ टक्के यंत्रमाग केवळ महाराष्ट्र या एका राज्यात आहेत. या व्यवसायाला सरकारने मदत न केल्यास कोरोना काळासारखे मजुरांचे उलटे स्थलांतर सुरु होईल.

शेतीनंतर सर्वाधिक रोजगार पुरवणारा वस्त्रोद्योग हा एकमेवर व्यवसाय आहे. भिवंडी, मालेगाव आणि इचलकरंजी ही वस्त्रोद्योग व्यवसायाची प्रमुख केंद्रे आहेत. आखाती युद्धामुळे या व्यवसायाची कच्चा माल व निर्यातीची साखळी उद्धवस्त झाली असून आठवड्यातील दोन दिवस उत्पादन बंद ठेवण्याची वेळ ओढावली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने या व्यवसायाला तातडीने आर्थिक पॅकेज देण्याची आवश्यकता आहे, असे आमदार रईस शेख यांचे म्हणणे आहे.

मुळात हा व्यवसाय महागड्या वीजेमुळे अडचणीत आहे. आर्थिक आतबट्ट्याचा असलेला हा व्यवसाय निर्यात ठप्प झाल्याने उद्धवस्त होण्याची भीती आहे. तसे झाल्यास राज्यातील लाखों कुशल-अकुशल रोजगार बुडण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने वस्त्रोद्योग व्यवसायाला आर्थिक पॅकेज देण्याची घोषणा करावी, अशी आग्रही मागणी आमदार रईस शेख यांनी पत्रात केली आहे.

कोण आहेत रईस शेख :

आमदार रईस शेख हे भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे समाजवादी पक्षाचे आमदार आहेत. त्यांची आमदारकीची दुसरी टर्म आहे. शेख हे यंत्रमाग व्यवसायातले तज्ञ लोकप्रतिनिधी आहेत. यंत्रमाग व्यवसायाला वीज सवलत मिळवण्यासाठी त्यांनी सरकारकडे नेटाने प्रयत्न केले होते.