मुंबई : राज्याच्या वस्त्रोउद्योग विभागाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळ, महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळ मर्यादित आणि महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ मर्यादित यांचे एकत्रिकरण केले जाणार आहे. एकत्रिकरणाची प्रक्रिया सध्या भारताचे नियंत्रक व महालेखापालांच्या पातळीवर सुरू असून, त्यांची मान्यता मिळताच मंत्रिमंडळापुढे एकत्रिकरणाचा प्रस्ताव सादर केला जाणार आहे.
वित्त विभागाच्या सार्वजनिक उपक्रम समितीने तोट्यातील महामंडळे बंद करा किंवा एकत्रिकरण करा, अशी शिफारस केली होती. त्यानुसार वस्त्रोउद्योग विभागाने एकत्रिकरणाची प्रक्रिया सुरू केली आहे. सध्या हातमाग आणि वस्त्रोउद्योग महामंडळ तोट्यात आहे. यंत्रमाग मंडळाने आपला तोटा कमी केल्यामुळे कामगारांचा पगार नियमित होण्याइतकी आर्थिक स्थिती सुधारली आहे. एकत्रिकरण केल्यामुळे तिन्ही महामंडळांची कामे एकत्रित होतील. प्रशाकीय आणि अन्य खर्च कमी होऊन उपलब्ध मनुष्यबळात काम करता येईल. मनुष्यबळावरील खर्च कमी होईल. सध्या वस्त्रोउद्योग विभागातील सर्व कर्मचारी निवृत्त झाले आहेत. हातमाग महामंडळात काही कर्मचारी कायमस्वरुपी तर काही कंत्राटी तत्वावर काम करीत आहेत. एकत्रिकरणानंतर एकाच व्यवस्थापकीय संचालकांकडून कारभार हाकला जाईल.
महामंडळांचे एकत्रिकरण प्रशासकीय आणि आर्थिकदृष्ट्या सोयाचे होणार असल्यामुळे एकत्रिकरणाचा निर्णय घेतला आहे. विभागाने प्रस्ताव तयार करून वित्त विभागाला पाठविला होता. वित्त विभागाच्या सूचनेनुसार भारताचे नियंत्रक व महालेखापालांच्या पातळीवर तिन्ही महामंडळांचा आर्थिक ताळमेळ (रिकन्सलेशन) घालण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वित्त विभागाच्या मान्यतेने प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करून त्याला मंजुरी घेण्यात येईल, अशी माहिती वस्त्रोउद्योग मंत्री संजय सावकारे यांनी दिली.
महामंडळांच्या स्थापने मागील उद्देश संपला
१) महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळ ६ सप्टेंबर १९६६ रोजी स्थापन करण्यात आले होते. प्रामुख्याने टाळेबंदीच्या मार्गावर असलेल्या किंवा आजारी पडलेल्या खासगी कापड गिरण्या ताब्यात घेणे आणि मागास भागांमध्ये नवीन गिरण्या सुरू करण्यासाठी महामंडळ स्थापन करण्यात आले होते. दीर्घकालीन आर्थिक तोट्यांमुळे महामंडळांतर्गत चालवल्या जाणाऱ्या सर्व गिरण्या बंद करण्यात आल्या आहेत.
२) महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळ मर्यादित १९७२ मध्ये स्थापन करण्यात आले होते. शासकीय, निमशासकीय कार्यालये, जिल्हा परिषदा, नगर परिषदा, महानगर पालिका आणि सरकारी रुग्णालयांना अधिकृत गणवेष व गणवेषाच्या कापडाचा पुरवठा करणे. बेडशीट, उशीचे कव्हर, ब्लॅकेट आणि चादरी पुरविण्याचे काम करीत होते, हे महामंडळ कसेबसे तग धरून आहे.
३) महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ मर्यादित हे महाराष्ट्रातील पारंपरिक हातमाग उद्योग आणि विणकरांच्या कल्याणासाठी १९७१ मध्ये स्थापन करण्यात आले होते. मुख्यालय नागपूरमध्ये असून, पारंपरिक हातमाग व्यवसाय व कला टिकवून ठेवणे. ग्रामीण भागातील कुशल विणकरांना रोजगार उपलब्ध करून देणे. विणकरांनी तयार केलेल्या उच्च दर्जाच्या आणि अस्सल हातमाग कापडाची बाजारपेठेत ओळख निर्माण करण्याचे काम केले जात होते.
