मुंबई: वनसंरक्षाणातील हलगर्जीपणा, विषप्रयोग, शिकार, विद्युत प्रवार किंवा मानवी हस्तक्षेप ही वाघांच्या मृत्यूचे कारण ठरत आहेत. यामुळे जैवविविधतेचे नुकसान तसेच पर्यटनावर प्रतिकुल परिणाम होत असल्याची बाब विधान परिषद सदस्यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर सरकारने वाघांसंदर्भातील आकडेवारीच सभागृहात जाहीर केली. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या अहवालानुसार २०२५ मध्ये एकाच वर्षात देशात १६६ वाघांचा मृत्यू झाला असून यात महाराष्ट्रातील ४१ वाघांचा समावेश असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले.

पेंच तसेच अन्य व्याघ्र प्रकूल्पांत वाघांचे मृत्यू होत असल्याची बाब सत्यजित तांबे, परिणय फुके यांनी तारांकित प्रश्नाद्वारे सभागृहात मांडली. वाघांचा मृत्यू होत असल्याने त्यांच्या संरक्षणासाठी देण्यात येणाऱ्या शासकीय निधीचा अपव्यय होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. यावर वनमंत्र्यांनी दिलेल्या उत्तरात पेंच प्रकल्पात डिसेंबरमध्ये एक आणि जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या दोन वाघांच्या मृत्यूमागे नैसर्गिक कारण असल्याचे स्पष्ट केले.

वाघांच्या संरक्षणासाठी ‘एम-स्ट्राइपेस’ प्रणाली असलेल्या मोबाईलचा पुरवठा कर्मचाऱ्यांना करण्यात आला आहे. संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत असून वाघांचे मृत्यू रोखण्यासाठी अतिसंवेदनशील भागात नियमित गस्त सुरू करण्यात आली आहे. श्वान पथकाच्या माध्यमातून शिकारी हालचालींवर नजर ठेवण्यात येत असल्याची माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली. खबऱ्यांची नेमणूक, बिनतारी संदेश यंत्रणावाघांचे मृत्यू रोखण्यासाठी अवैध शिकार्यांची माहिती मिळवण्यासाठी परीक्षेत्र स्तरावर खबऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

अतिसंवेदनशील भागात बिनतारी संदेश यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे प्रधान मुख्य वन संरक्षक कार्यालय, नागपूर येथे वन्यजीव गुन्हे कक्षाची निर्मिती करण्यात आली असून अतिसंवेदनशील भागात वाहनांसाठी तपासणी नाक्यांवर वाहनांची नियमित तपासणी करण्यात येत आहे. वाघ व बिबट मागोव्याचा पंधरवडी कार्यकम राबवून त्यांच्या अस्तित्वाची तपासणी करण्यात येते. वाघांचे भ्रमण मार्ग, पाणवठे या ठिकाणी कॅमेरे लावून वन्यजीवांचे नियमित ट्रॅपिंग, हिस्र प्राण्यांचे मानवांवरील हल्ले कमी करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यात येत असल्याची माहिती नाईक यांनी दिली.