मुंबई : केंद्रीय करातून राज्याला मिळणारा वाटा ९८ हजार ३०६ कोटी रुपये इतका असणार आहे. याशिवाय अर्थसंकल्पाचे प्राथमिक आकलन करता १२ हजार ३५५ कोटी विविध प्रकल्पांसाठी आहेत. त्यामुळे या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून राज्याला सुमारे एक लाख कोटी मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. हा अर्थसंकल्प विकसित भारताकडे दमदार वाटचाल करणारा आहे, असे ते म्हणाले.
अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया व्यक्त करताना फडणवीस म्हणाले, “यंदाच्या अर्थसंकल्पात शहरीकरणाला नियोजनबद्ध करुन, उद्योग आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देऊन, गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीसाठी खंबीर उपाययोजना करण्यात आली आहे. पायाभूत सुविधा क्षेत्रात १२ लाख कोटींची गुंतवणूक सरकार करणार आहे, पूर्वी ही गुंतवणूक केवळ १ लाख कोटी होती.”
शहरीकरणाचा एकात्मिक विचार करून विविध क्षेत्रांसाठी निधी दिला जाणार असल्यामुळे राज्याला मोठा लाभ होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. त्याबरोबरच शेती, पशुपालन, मत्स्यव्यवसाय आणि सिंचन यासह ‘शी-मार्ट’, प्रत्येक जिल्ह्यात उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी वसतीगृह. जिल्हा रुग्णालयात आपात चिकित्सा व्यवस्था, मुंबई-पुणे, पुणे-हैदराबाद हायस्पीड कॉरिडॉर, ग्रोथ हब, इत्यादी योजनांचा राज्याला विविध प्रकारे लाभ होणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

