मुंबई : ‘कणखर देशा, महाराष्ट्र देशा’ अशी ओळख असलेल्या महाराष्ट्राने पर्यटनाच्या नकाशावरही आपला ठसा उमटवला आहे. समुद्रकिनारे, गड-किल्ले, धार्मिक स्थळे, निसर्गरम्य ठिकाणे आणि मुंबई, पुणे, कोल्हापूरसारखी शहरे यामुळे महाराष्ट्र परदेशी पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरत आहे. राज्यात २०२५ मध्ये तब्बल ४४ लाख ९७ हजार विदेशी पर्यटकांनी भेट दिली. परदेशी पर्यटकांच्या भेटींच्या बाबतीत महाराष्ट्राने देशात दुसरे स्थान पटकावले आहे.
पर्यटन मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशांतर्गत पर्यटकांच्या भेटींमध्ये महाराष्ट्र सहाव्या स्थानी, तर परदेशी पर्यटकांच्या भेटींमध्ये दुसर्या स्थानी आहे. मुंबईची महानगरीय ओळख, अजिंठा-वेरूळचा वारसा, सह्याद्रीतील गड-किल्ले, कोकणचे समुद्रकिनारे, धार्मिक पर्यटन आणि पश्चिम महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांमुळे राज्यातील पर्यटनाला गती मिळत आहे. त्यामुळे देशांतर्गतच नव्हे, तर परदेशी पर्यटकांमध्येही महाराष्ट्राची पसंती वाढत आहे.
राज्यात २०२१ मध्ये ४ कोटी ३६ लाख देशांतर्गत पर्यटक आले होते. २०२५ मध्ये ही संख्या २७ कोटी ५६ लाखांवर पोहोचली. परदेशी पर्यटकांच्या भेटींची संख्या २०२२ मधील १५.१२ लाखांवरून २०२५ मध्ये ४४.९७ लाखांवर पोहोचली. म्हणजे चार वर्षांत परदेशी पर्यटक भेटींमध्ये तब्बल २ हजार ३२२ टक्के वाढ झाली आहे.

गेल्या वर्षी राज्यात सर्वाधिक हॉटेल्स सुरू झाली. त्यामुळे १० हजार नवीन खोल्यांची निर्मिती झाली. राज्यात पाहण्यासाठी खूप काही आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे मीडिया कॅम्पेन राबविले जाते. राज्याचे नवीन पर्यटन धोरण सर्वसमावेशक आहे. त्यामुळे राज्यात विदेशी आणि देशांतर्गत पर्यटकांची संख्या वाढत आहे.- संजय खंदारे, अतिरिक्त मुख्य सचिव,पर्यटन,महाराष्ट्र
महाराष्ट्रात काय?
लोणावळा, महाबळेश्वर, कोकण किनारपट्टी तसेच ताडोबा-अंधारी, मेळघाट आणि नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पांमुळे महाराष्ट्र देश-विदेशातील पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे.
