मुंबई : राजकारणात मतभेद, संघर्ष होत असतो, परंतु अशा प्रकारे टोकाची भूमिका घेण्याची महाराष्ट्राची परंपरा नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी, त्यांच्या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर व्यक्त केली. नैराश्यातून हा प्रकार घडला आहे, तरीही आपण एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठिशी आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली. मात्र चुकीच्या नेतृत्वाचे  समर्थन करणार नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले. 

एसटी कर्मचाऱ्यांच्या एक गटाने शुक्रवारी दुपारी अचानाकपणे पेडर रोड येथील शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवास्थानी दगडफेक केली. त्यांच्या निवास्थानाबाहेर तासभर हा गोंधळ सुरु होता. अगदी आपल्या घरावर  हल्ला झाल्यानंतरही पवार यांनी शांतपणे या संपूर्ण घटनेवर आपली भूमिका माध्यमांसमोर मांडली. एसटी कर्मचारी कारण नसताना काही महिने घरदार सोडून नोकरीच्या बाहेर राहिले आणि त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर आर्थिक संकट आले. त्यातून आत्महत्या करण्याची टोकाची भूमिका त्यांना घ्यावी लागली. जे नेतृत्व अतिटोकाची भूमिका घेते, तेच आत्महत्या किंवा तत्सम गोष्टींना जबाबदार आहे, असा आरोपही त्यांनी केला.

 आज इथे जे काही घडले त्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्याचे कारण नाही. राजकारणात मतभेद असतात, संघर्ष असतात पण टोकाची भूमिका घेण्याची परंपरा महाराष्ट्राची नाही असे त्यांनी म्हटले आहे. एसटी कर्मचारी आणि आपले गेले ५० वर्षांचे घनिष्ट संबंध आहेत. त्यांचे एकही अधिवेशन माझ्याकडून चुकले नाही. त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले. मात्र याचवेळी एक चुकीचा रस्ता दाखवला गेला आणि त्याचे दुष्परिणाम आज याठिकाणी आपण पाहतो आहेत असे त्यांनी निदर्शनास आणले.  आपण संयम पाळणारे लोकं आहोत आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या आपण पाठिशी आहोत परंतु चुकीच्या नेतृत्वाच्या पाठिशी नाही  असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. एसटी कर्मचाऱ्यांना चुकीचा रस्ता कोण दाखवत असेल तर त्याला  विरोध करणे ही तुमची माझी जबाबदारी आहे असे ते राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले.