मुंबई : इ-चलन प्रणाली विरोधात राज्यातील वाहतूकदारांनी येत्या ५मार्च पासून बेमुदत चक्का जाम आंदोलनाचा इशारा दिला आहे. या आंदोलनात ट्रक, टेम्पो, खाजगी वाहतूक कंपन्या, रिक्षा, टॅक्सी, शालेय बस सहभागी होणार असल्याने राज्यातील माल वाहतूकीसह काही प्रमाणात प्रवासी वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
पोलिस विभाग व परिवहन विभाग इ-चलन देताना योग्य ती अंमलबजावणी करत नसल्याचा आरोप वाहतूक दारांनी केला आहे. केंद्र सरकारने जानेवारी २०२६ मध्ये सुधारणा करून ४५ दिवसापर्यंत दंड न भरल्यास वाहनाचे कामकाज थांबवून वाहन जप्त करण्याची तरतूद केली आहे. त्यात जनतेला न्यायालयात प्रकरण चालविण्याचा हक्क पूर्णपणे काढून घेतला आहे. इ-चलन यंत्रणा जनतेवर व वाहनधारकांवर जबरदस्तीने लादून खोटे गुन्हे दाखल करून जबरदस्तीने दंड वसूल करण्यात येत असल्याचे महाराष्ट्र ट्रान्सपोर्टर्स अॅक्शन कमिटीचे म्हणणे आहे.
राज्यातील सर्वच मालवाहतूक दार या संपात सहभागी होणार आहेत. राज्यातील सुमारे १५ लाख वाहने चक्का जाम मध्ये सहभागी होतील .त्यामुळे राज्यातील दूध,अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. मालवाहतूक दारांच्या संपामुळे दिवसाला सुमारे दीड हजार कोटी रुपयांचे नुकसान होण्याचा अंदाज आहे.
महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट ॲक्शन कमिटीने ५ मार्च पासून बेमुदत चक्काजाम करण्याचा निर्णय गुरुवारी घेतला आहे. पाच तारखेला दुपारी बारा वाजता राज्यातील सर्व वाहतूकदार वाहने घेऊन आझाद मैदानाकडे जातील. तेथे आंदोलन केले जाईल. इ-चलना बाबत जोपर्यंत सकारात्मक निर्णय होत नाही, तोपर्यंत चक्काजाम सुरुच राहणार आहे. – बाबा शिंदे,अध्यक्ष,राज्य माल व प्रवासी वाहतूक संघटना.

