मुंबई : राज्यातील वाहतूकदारांच्या इ-चलन आणि विविध प्रलंबित प्रश्नांबाबत सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सकारात्मक भूमिका घेत लवकरच चर्चा घडवून आणण्याचे आश्वासन दिले. सरकारच्या सकारात्मक भूमिकेमुळे राज्यातील मालवाहतूकदारांनी शुक्रवारपासून पुकारलेला बेमुदत संप मागे घेतला. दरम्यान, सात दिवसानंतर राज्य सरकारने मागण्यांबाबत योग्य निर्णय घेतला नाही, तर संप पुकारण्यात येईल, असा इशारा मालवाहतूकदारांनी दिला.

वाहतूक पोलिस आणि आरटीओ बेकायदेशीरपणे इ-चलन वसूल करी असून त्यामुळे वाहतूकदारांचे आर्थिक नुकसान आणि पिळवणूक होत असल्याचा आरोप करीत मालवाहतूकदारांनी गुरुवारपासून बेमुदत आंदोलनचा इशारा दिला होता. गुरुवारी स्थानिक पातळीवर निवदेन दिल्यानंतर शुक्रवारपासून आंदोलन सुरू होणार होते. या आंदोलनामुळे राज्यातील मालवाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता लक्षात घेऊन गुरुवारी प्रताप सरनाईक यांनी मालवाहतूकदारांशी चर्चा केली. या विषयासंदर्भात येत्या आठवडाभरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत महाराष्ट्र वाहतूकदार कृती समिती आणि विविध वाहतूक संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्याचे आश्वासन मालवाहतूकदारांना देण्यात आले.

या बैठकीत ई-चलन प्रणाली, टोलवसुली, करप्रणाली, तसेच वाहतूकदारांच्या इतर प्रलंबित मागण्यांवर सविस्तर चर्चा करून सकारात्मक तोडगा काढण्याबाबत आश्वासन दिल्याने महाराष्ट्र वाहतूकदार कृती समिती, तसेच विविध वाहतूक संघटनांनी सुरू असलेले आंदोलन तात्पुरते मागे घेण्याचा निर्णय घेतला. आगामी बैठकीत राज्य सरकारकडून सकारात्मक निर्णय अपेक्षित असून वाहतूकदारांच्या न्याय्य मागण्यांवर योग्य तो मार्ग निघेल, असा विश्वास महाराष्ट्र वाहतूकदार कृती समितीने व्यक्त केला आहे.

प्रताप सरनाईक यांनी मालवाहतूकदारांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. महाराष्ट्र वाहतूकदार कृती समितीला तसे लेखी आश्वासन देण्यात आले आहे. त्यामुळे शुक्रवारपासून सुरू होणारा बेमूदत संप मागे घेण्यात आला आहे. दरम्यान, मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर ७ दिवसानंतर पुन्हा संप करण्यात येईल. – हर्ष कोटक, सचिव, मुंबई बस मालक संघटना