मुंबई : गेल्या अनेक कालावधीपासून राज्यातील अवजड आणि प्रवासी वाहतूकदार संघटना इ-चलन रद्द करण्याची मागणी करत आहेत. याबाबत अनेक आंदोलने, संप, चक्का जाम झाला तरी राज्य सरकारने ठोस भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे गुरूवारी पुन्हा राज्यस्तरीय तीव्र आंदोलन करण्याची भूमिका घेण्यात आली. परंतु, या आंदोलनात अनेक मालवाहतुकदार संघटना सहभागी झाल्या नाहीत. तसेच आंदोलनकर्त्या संघटनेत ताळमेळाचा अभाव होता. परिणामी, आंदोलन फसल्याचे दिसून आले. मुंबईतील जीवनावश्यक सेवा, फळ-फुलांची आवक सुरू होती. दरम्यान, सध्याची अमेरिका-इराण युद्ध परिस्थितीमुळे आंदोलन मागे घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

राज्यातील मालवाहतुकदार चालकांद्वारे इ-चलनाच्या नावाखाली आर्थिक लूट केली जाते. त्यांच्याकडून जबरदस्तीने दंडवसुली केले जाते. इ-चलन रद्द करण्याबाबत राज्य सरकारद्वारे कोणतीही ठोस पावले उचलली जात नसल्याने, गुरुवारी राज्यस्तरीय चक्काजाम आंदोलन करण्याचे नियोजन होते. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आरटीओ कार्यालयावर आंदोलन करण्याचे योजले होते. तसेच मुंबईतील आझाद मैदानात घोषणाबाजी करून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला गेला होता. राज्यभरातील अनेक ठिकाणी आंदोलनाने उग्र रुप धारण केले. या आंदोलनाची झळ मुंबईकरांना बसण्याची दाट शक्यता होती. परंतु, आंदोलनात उतरलेल्या संघटनांमध्ये एकवाक्यता नव्हती. आंदोलनात बहुसंख्य संघटनांनी पाठ दाखविली. परिणामी, शालेय बस दोन्ही सत्रात सुरू होत्या. मालवाहतुकदारांच्या गाड्या घाऊक आणि किरकोळ बाजारात आल्या होत्या. खासगी बस सेवा सुरू होती.

मुंबईत पुणे, वाशी, सोलापूर येथून दूध येते. मुंबईत दररोज सुमारे ४० लाख लीटर दुधाची विक्री केली जाते. मालवाहतुकदारांच्या आंदोलनामुळे सध्या मुंबईत कोणताही परिणाम झाला नाही. दुधाचा पुरवठा सर्वत्र झाला आहे. – जगदीश कट्टीमनी, सरचिटणीस, मुंबई दूध विक्रेता संघ

दादर येथील माँ साहेब मीनाताई ठाकरे फुल मंडईत फुलांची आवक योग्यरित्या झाली. मालवाहतुकदारांच्या आंदोलनामुळे फुलाच्या व्यापारावर कोणताही परिणाम झाला नाही. दादर मंडईत ५० ते ६० फुलाच्या मालगाड्या येतात. शेतकऱ्यांच्या स्वतःच्या मालगाड्या असल्याने, फुलाच्या वाहतुकीवर परिणाम झाला नसावा. – दादाभाऊ येणारे, फुल विक्रेते

आंदोलनात सहभागी नाही

मालवाहतुकदारांच्या आंदोलनात आमच्या संघटनेने सहभाग घेतला नाही. सध्याच्या झालेल्या आंदोलनाला कोणताही आधार नव्हता. हे आंदोलन रमजान ईद झाल्यानंतर करण्याचे सुचविले होते. रमाजनमध्ये फळांची विक्री अधिक होते, याचा फायदा शेतकऱ्यांना होतो. विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत. तसेच ई-चलनाविषयी राज्य सरकार सकारात्मक होते. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, काही मालवाहतूक संघटनांनी धावपळीत आंदोलन केले. – उदयसिंह बर्गे, अध्यक्ष, वाहतूकदार बचाव कृती संघटना, महाराष्ट्र राज्य

मालवाहतुकदारांचे आंदोलन पुढे ढकलले

राज्यातील वाहतूक क्षेत्राला प्रभावित करणाऱ्या अनेक महत्त्वाच्या समस्या, विशेषत: इ-चलन प्रणालीविरोधात आंदोलन पुकारले होते. परंतु, राज्यात विधिमंडळाचे चालू अर्थसंकल्पीय अधिवेशन, सध्याची भू-राजकीय परिस्थिती आणि त्याचा अर्थव्यवस्थेवर होणारा संभाव्य परिणाम, आयात-निर्यात मालवाहतूक, तसेच विद्यार्थ्यांच्या सुरू असलेल्या परीक्षा लक्षात घेऊन,आंदोलनाचा पुनर्विचार करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवाहन केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संघटनांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे राज्य आणि देशाच्या व्यापक हितासाठी मालवाहतुकदारांचे आंदोलन पुढे ढकलण्यात आले आहे. – बल मलकीत सिंह, माजी अध्यक्ष, ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस

या संघटना आंदोलनात उतरल्या नाहीत

वाहतूकदार बचाव कृती संघटना महाराष्ट्र राज्य, ट्रक टेम्पो बस टॅंकर वाहतूक महासंघ महाराष्ट्र राज्य, मोटर मालक कामगार वाहतूक संघटना महाराष्ट्र राज्य, स्वाभिमान एकता मालवाहतूक संघटना सांगली, मुंबई मालवाहतूक टेम्पो महासंघ, मुंबईचा टेम्पोवाला वाहतूक संघटना, गोरेगाव ट्रान्सपोर्ट असोसिएशन, विश्व गती मोटर मालक संघ, अहिल्यानगर कल्याणकारी मोटर मालक संघ, अमरावती मोटर मालक संघ