मुंबई : महाराष्ट्र युसीसी (समान नागरी संहिता ) मसुदा समितीचे सदस्य निवृत्त न्यायमूर्ती आर.सी. चव्हाण यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने समितीची विश्वासार्हता धुळीस मिळाली आहे. न्या. चव्हाण यांच्या रिक्त जागी अल्पसंख्याक समुदायाला प्रतिनिधित्व द्यावे. यामुळे मसुदा समितीची विश्वासार्हता वाढेल, अशी मागणी समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी केली आहे. यासंदर्भात आमदार रईस शेख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.
याबाबत माहिती देताना आमदार रईस शेख म्हणाले की, जुलै महिन्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र युसीसी मसुदा समितीची गठन करण्यात आले. या समितीला अहवाल देण्यासंदर्भात सहा महिन्याची मुदत दिलेली आहे. समितीवर एकही अल्पसंख्यांक समुदायातील प्रतिनिधी नाही. त्यामुळे समितीकडे संशयाने पाहिले जात असून न्या. चव्हाण यांनी १९ सप्टेंबर रोजी दिलेल्या राजीनाम्यामुळे समितीची विश्वासार्हता राहिलेली नाही.
युसीसी मसुदा तयार करण्यामागे भाजपचा राजकीय डाव आहे. केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या कायद्याचा घाट केंद्र आणि राज्यातल्या भाजप – महायुती सरकारने घातला आहे. या कायद्यामुळे देशातील सांस्कृतिक बहुविविधता सपुष्टात येणार आहे. तसेच घटस्फोट, वारसा हक्क, विवाह, दत्तक आदी विविध धर्मीयांचे जे अनेक वर्षांचे पर्सनल लॉ आहेत, ते सुद्धा संपुष्टात येणार आहेत. त्यामुळे या प्रस्तावित युसीसी कायद्याकडे अल्पसंख्याक समुदाय संशयाने पाहत असल्याचे आमदार रईस शेख यांनी स्पष्ट केले.
या युसीसी कायद्याने बहुसंख्याकाचे नियमन लादण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्यामुळे भाजप शासीत राज्यात हा कायद्या लागू करण्याचा प्रयत्न आहे. या प्रस्तावित कायद्याविषयी संशय दूर करण्यासाठी आणि मसुदा समितीवरील आक्षेप संपवण्यासाठी अल्पसंख्याक समुदायाला समितीमध्ये प्रतिनिधित्व देणे आवश्यक आहे. कारण या कायद्याचा अल्पसंख्याक समुदाय आणि आदिवासी समुदायांना मोठा फटका बसणार आहे, असा दावा आमदार रईस शेख यांनी केला आहे.
