मुंबई : राज्यात चालू वर्षी एप्रिल व मे या काळात विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारने ८४ कोटी २३ लाख ६५ हजार रुपयांच्या मदतीस मंजुरी दिली आहे. महसूल व वन विभागाने या संदर्भातील शासन निर्णय जारी केला आहे.
राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (एमडीआरएफ) अंतर्गत ही मदत वितरित केली जाणार असून, शासनाने निश्चित केलेल्या दरानुसार लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट (डीबीटी) रक्कम जमा केली जाणार आहे. संबंधित जिल्हा प्रशासनाने लाभार्थ्यांची माहिती पडताळून ती संगणकीय प्रणालीवर नोंदविली जाणार आहे.
या मदतीचा लाभ राज्यातील ४५,०४२ शेतकऱ्यांना मिळणार असून, सुमारे ३८,३५८ हेक्टर क्षेत्रावरील पिकांच्या नुकसानीसाठी ही आर्थिक मदत दिली जाणार आहे.
विभागनिहाय मदत अशी
सर्वाधिक मदत अमरावती विभागाला मिळाली असून, तेथील २८,५७१ शेतकरी आणि ३०,३२५ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी ६८.०९ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्याखालोखाल नागपूर विभागासाठी ६.०७ कोटी, नाशिक विभागासाठी ५.२४ कोटी, पुणे विभागासाठी ३.७३ कोटी, छत्रपती संभाजीनगर विभागासाठी ७६.९९ लाख आणि कोकण विभागासाठी ३२.१४ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
या जिल्ह्यांना मिळणार मदत
नागपूर, गोंदिया, वर्धा, नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नांदेड, धाराशिव, हिंगोली, लातूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, सांगली, पुणे आणि कोल्हापूर या जिल्ह्यांतील बाधित शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ मिळणार आहे.
निधी बँकांकडून कर्जवसुलीसाठी वळवता येणार
मदतीचा निधी बँकांकडून कर्जवसुलीसाठी वळवता येणार नाही. तसेच मदत वितरण पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी आणि मदतीचा तपशील संबंधित जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत, अशी माहिती आपत्ती व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिली.
