मुंबई : यावर्षी महाराष्ट्रासह देशातील हवामानात झपाट्याने बदल होत आहेत. अनेक भागात उष्णतेची लाट सदृश्य परिस्थिती, तर अनेक भागात वादळी वारे, गारपीट आणि पावसाची नोंद होत आहे. दरम्यान, विविध हवामान अहवालांनुसार, ३ ते ५ एप्रिलदरम्यान पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव आणखी तीव्र होणार असून यामुळे देशातील अनेक राज्यात विशेतः उत्तरेच्या राज्यात वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता हवामान अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.

हवामान अभ्यासकांच्या मते, एक तीव्र पश्चिमी विक्षोभ भारतीय उपखंडाच्या दिशेने सरकत असून पुढील तीन दिवस विशेषतः भारताच्या उत्तरेच्या राज्यात पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव अधिक असणार आहे. सध्या पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव अरबी समुद्राच्या उत्तरेला आहे. भारताच्या पश्चिम आणि उत्तर भागात शुक्रवारपासून पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव वाढणार आहे.

याचा परिणाम म्हणून जोरदार वादळी वारे वाहण्याची शक्यता असून गारपीट आणि पावसाचे प्रमाणही वाढणार आहे. यामुळे चिंतेत असणाऱ्या बळीराजाच्या समस्येत आणखी वाढ होणार असून अनेक भागात पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. राजस्थान, पंजाब, हरियाणा, जम्मू आणि काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र आणि गुजरात आदी राज्यांमध्ये पावसाची शक्यता हवामान अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्रातील स्थिती काय असेल ?

राज्यातील अनेक भागात पावसाळी हवामान कायम असून अनेक भागांना गुरुवारी हवामान विभागाकडून ‘यलो अलर्ट’, तर काही भागांना ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. अनेक भागात पाऊस आणि गारपिटीची नोंद होत आहे. सध्या उत्तर मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र येथे पावसाची नोंद होत आहे. तर विदर्भ आणि मराठवाड्यातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ३ ते ५ एप्रिलदरम्यान मराठवाडा आणि विदर्भात पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.

सध्या काही भागातील कमाल तापमानात काहीशी घट नोंदली जात आहे. विशेषतः कोकण पट्ट्यातील कमाल तापमानात मागील काही दिवसांपासून काहीशी घट नोंदली जात आहे. तर राज्याच्या बहुतांश भागात सरासरी इतके कमाल तापमान नोंदले जात आहे. दरम्यान, राज्यातील काही भागात कमाल तापमानात पुढील तीन दिवसात २ ते ४ अंश सेल्सिअसने घट होणार असून त्यांनतर हळूहळू वाढ होईल, अशी शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.