मुंबई : विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांतील निवडणुकीवरून सत्ताधारी महायुतीत बंडखोरी झाली असतानाच, दुसरीकडे भाजपने शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला कमी जागा सोडत मित्र पक्षांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. महायुतीतील बंडखोरी शमविण्याचे मोठे आव्हान नेतेमंडळींसमोर आहे. प्रत्यक्ष मतदान झाल्यास मोठ्या प्रमाणावर नगरसेवकांच्या मताला भाव येण्याची वर्तविली जात आहे.
विधान परिषदेच्या १७ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत महायुतीत भाजपने ११ जागा स्वत:साठी ठेवल्या आहेत. शिवसेना शिंदे गटाला चार तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला दोन जागा सोडल्या आहेत. करोना साथीमुळे पालिकांच्या निवडणुका रखडल्याने स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांमधील निवडणुका होऊ शकल्या नव्हत्या. मुदत संपलेल्या या जागांमध्ये भाजप सात, शिवसेना पाच, राष्ट्रवादी ३ तर काँग्रेसचे दोन आमदार होते. अर्थात तेव्हा शिवसेना व राष्ट्रवादीत फूट पडलेली नव्हती.
या वेळी भाजपने शिवसेना, राष्ट्रवादीने गेल्या वेळी जिंकलेल्या छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर या जागा स्वत:कडे घेतल्या आहेत. याशिवाय गेल्या वेळी काँग्रेसने जिंकलेल्या सातारा-सांगली, नांदेड या मतदारसंघांतही उमेदवार उभे केले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे छत्रपती संभाजीनगरच्या जागेसाठी शेवटपर्यंत आग्रही होते. पण भाजपने ही जागा सोडण्यास ठाम नकार दिला. राष्ट्रवादीला पुण्याच्या जागेसाठी शेवटपर्यंत ताटकळत ठेवले होते. पुण्याची जागा सोडण्यास भाजपची तयारी नव्हती.
एकूणच या निवडणुकीत भाजपने शिवसेना शिंदे व राष्ट्रवादी अजित पवार या दोन्ही मित्र पक्षांची अधिकच्या जागांची मागणी मान्य केली नाही. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये शिवसेना शिेंदे गटाच्या नगरसेवकांची संख्या जास्त असली तरी सुनील तटकरे यांनी ही जागा मुलासाठी प्रतिष्ठेची केल्याने भाजपने शिंदे यांना या जागेवरील दावा मागे घेण्यास भाग पाडल्याचे सांगण्यात येते.
छत्रपती संभाजीनगर मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेला असला तरी माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुलाने बंडखोरी केली आहे. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे यांच्या विरोधात शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांच्या विरोधात बंड केले आहे. पुण्यात राष्ट्रवादीत उमेदवारीवरून वादावादी झाली. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत ही गुरुवारपर्यंत आहे. या मुदतीत बंडखोरांची मनधरणी केली जाईल.
भाजपची भिस्त पुन्हा आयातांवर
भाजपचे ११ पैकी पाच उमेदवार हे अन्य पक्षांमधून भाजपवासी झालेले आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपने उमेदवारी दिलेले सुहास शिरसाट हे राष्ट्रवादीचे पदाधिकारी होते. त्यांची आई जिल्हा महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा होत्या. अमर राजूरकर, बसवराज पाटील हे काँग्रेसचे माजी आमदार आहेत. प्राजक्त तनपुरे हे राष्ट्रवादीचे माजी आमदार आहेत. राजेंद्र राऊत हे काँग्रस व शिवसेनेत आमदार होते.
कोण आहेत मतदार ?
स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायतींचे नगरसेवक तसेच जिल्हा परिषदांचे सदस्य व पंचायत समित्यांचे सभापती हे मतदार असतात. गुप्त पद्धतीने मतदान होत असल्याने आर्थिकदृष्ट्या सक्षम किंवा नगरसेवकांची मते खरेदी करण्याची ऐपत असलेल्याला विजय मिळविणे सहज शक्य होते. नगरसेवकांची मते मिळविण्यात यशस्वी होणाऱ्या उमेदवाराचे पारडे नेहमी जड असते. निवडणुकीचे चित्र माघारीनंतर गुरुवारी स्पष्ट होणार असले तरी प्रत्यक्ष मतदान झाल्यास नगरसेवकांचा ‘भाव’ वाढणार आहे.
