मुंबई : विधान परिषद निवडणुकीतील उमेदवारीवरून महायुतीत ठिकठिकाणी उफाळून आलेली बंडखोरी शमण्याच्या मार्गावर आहे.
छत्रपती संभाजीनगर-जालना येथून शिवसेनेचे माजी मंत्री अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर सत्तार उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ही जागा भाजपाच्या वाट्याला आल्याने सत्तार यांनी बंडाचे निशाण फुंकले होते. तर कोकणमधून शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आमदार महेंद्र दळवी यांची कन्या जुईली दळवी यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) अनिकेत तटकरे यांना उमेदवारी जाहीर झाल्याने त्या नाराज होत्या.

विधान परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर महायुतीत ठिकठिकाणी उफाळून आलेली बंडखोरी शमविण्याकरिता पडद्यामागून हालचाली सुरू आहेत. अर्ज मागे घेण्याचा आज (गुरूवार) शेवटचा दिवस असल्याने राजकीय हालचालींना वेग आला होता.

भाजपविरोधात जाहीरपणे नाराजी व्यक्त करत सत्तारांनी उमेदवारीवर ठाम असल्याचे संकेत दिले होते. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चर्चा करून त्यांची समजूत काढली. अखेर, वरिष्ठांच्या सूचनेनुसार युती धर्म पाळत अर्ज मागे घेतला जाईल, अशी ग्वाही देत सत्तार यांनी बुधवारी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली.नांदेडमध्येही महायुतीतील बंडखोरी टळण्याची शक्यता आहे. तर परभणी-हिंगोलीतील मेराज खान या अपक्ष उमेदवाराने माघार घेतली आहे. यवतमाळमध्ये काँग्रेस उमेदवाराने माघार घेतली.