मुंबई: विधान परिषदेच्या १७ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी बंडखोरीला उधाण आले. भाजप वगळता सर्वच पक्षांत उमेदवारीवरून गोंधळ निर्माण झाला. अहिल्यानगर मतदारसंघात महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले. तर पुण्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केले तर यवतमाळमध्ये शिंदे गटातील दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने संभ्रम निर्माण झाला.
नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि रायगडमध्येही महायुती आणि महाविकास आघाडीत बंडखोरांनी अर्ज भरल्याने मित्रपक्ष आमने-सामने उभे ठाकले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत ४ जून असल्याने त्यानंतरच या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वाट्याला दोन जागा आल्या आहेत. यापैकी पुणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून उद्योजक संजय काकडे यांचे चिरंजीव विक्रम यांनी तसेच माजी आमदार सुनील टिंगरे यांनी अर्ज भरले आहेत.
अहिल्यानगर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात भाजपच्या प्राजक्त तनपुरे यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या राणी लंके, काँग्रेसच्या करण ससाणे आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या मछिंद्र धुमाळ यांनी अर्ज भरले आहेत.यवतमाळ मतदारसंघात शिवसेना शिंदे गटातील दुष्यन्त चतुर्वेदी आणि मंत्री संजय राठोड यांच्या पत्नी शीतल राठोड यांनीही उमेदवारी अर्ज भरले, तर छत्रपती संभाजीनगर-जालना मतदारसंघात भाजपच्या सुहास शिरसाट यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाचे माजी मंत्री अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव समीर सत्तार यांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. रायगड मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाच्या जुईली दळवी यांनी अपक्ष अर्ज दाखल करत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अनिकेत तटकरे यांच्याविरोधात बंडखोरी केली आहे.
प्रदेश काँग्रेसने दिलेल्या माहितीनुसार नांदेड मतदारसंघातून रामदास पाटील -सुखटनकर हे पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत. त्याचवेळी माजी आमदार माधवराव पाटील -जळगावकर यांनीही अर्ज दाखल केला आहे. नांदेडमध्ये भाजपकडून अमर राजूरकर यांनी अर्ज भरला असून येथे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार प्रताप पाटील -चिखलीकर यांचे चिरंजीव प्रवीण आणि हिंगोलीत ठाकरे गटाचे उमेदवार डॉ.विवेक नावंदर यांच्याविरोधात ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील-अष्टीकर यांचे चिरंजीव कृष्णा यांनी बंडखोरी केली आहे. .
दरम्यान, काँग्रेसने वर्धा-चंद्रपूर-गडचिरोलीमधून शैलेश अग्रवाल,भंडारा-गोंदियातून माजी आमदार दिलीप बनसोड यांना उमेदवारी दिली आहे. याशिवाय अपक्ष उमेदवार म्हणून प्रफुल अग्रवाल, नरेश ईश्वरकर यांचा यादीत उल्लेख आहे. यवतमाळ साहेबराव दत्तराव कांबळे, अमरावती येथून हर्षदीप देशमुख, नागपूर पोटनिवडणुकीत काँग्रेसकडून अतुल लोंढे आणि दिनेश ढोले असे दोघांनी अर्ज भरले आहेत . धाराशिव-लातूर-बीड मधून महेश देशमुख, सोलापूरमधून आदित्य फत्तेपूरकर यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाली आहे.
स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील उमेदवार
शिवसेना -शिंदे गट
ठाणे : रवींद्र फाटक
नाशिक: नरेंद्र दराडे
यवतमाळ: दुष्यन्त चतुर्वेदी किंवा शीतल राठोड
परभणी-हिंगोली :सईद खान
राष्टवादी अजित पवार
रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग : अनिकेत तटकरे
पुणे : विक्रम काकडे किंवा सुनील टिंगरे
शिवसेना ठाकरे गट
नाशिक : अनिल कदम
परभणी-हिंगोली: डॉ.विवेक नावंदर
छत्रपती संभाजीनगर-जालना : देवयानी कृष्णा पाटील डोणगावकर
जळगाव : शरद तायडे
रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग : सुरेंद्र उर्फ बाळ माने
राष्ट्रवादी शरद पवार गट
पुणे: श्रीकांत पाटील
ठाणे: अभिजित पवार
सांगली-सातारा : बाळासाहेब उर्फ बापू पाटील
