मुंबई : विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी सहा मतदारसंघांत महायुतीच्या उमेदवारांची बिनविरोध निवड झाली. महाविकास आघाडी किंवा अपक्ष उमेदवारांच्या अर्ज माघारीचा महायुतीला फायदा झाला. कोकण व छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातील माघार घेतलेल्या उमेदवारांची शिवसेना ठाकरे गटाने पक्षातून हकालपट्टी केली. काँग्रेसच्या उमेदवारांनी काही ठिकाणी माघार घेऊन पक्षाला धक्का दिला.
विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील १७ जागांसाठी होणार्या निवडणुकीत महायुतीकडे संख्याबळ अधिक असल्याने भाजप, शिवसेना शिंदे व राष्ट्रवादी अजित पवार गटाला यश मिळणार हे निश्चित होते. तरीही महाविकास आघाडीने सर्व १७ जागांवर उमेदवार उभे करून आव्हान देण्याची भाषा केली होती. त्यातच महायुतीत धुसफूस झाली होती. काही मतदारसंघात महायुतीच्या मित्र पक्षांनी परस्परांविरोधात अर्ज दाखल केले होते. महायुतीतील वादाचा फायदा उठविण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न होता. पण आघाडीच्या उमेदवारांनी परस्पर माघार घेतल्याने मविआला मोठा धक्का बसला.
ठाणे, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, यवतमाळ, चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली, पुणे, अहिल्यानगर या सहा मतदारसंघांतील निवडणूक बिनविरोध झाली. या मतदारसंघांतील महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी माघार घेतली. परिणामी ११ मतदारसंघांमध्ये १८ जूनला प्रत्यक्ष मतदान होईल.
कोकणात माघारनाट्य
रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात महायुतीतील राष्ट्रवादी व शिवसेनेत उमेदवारीवरून वाद झाला होता. त्यातच शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्येने अपक्ष अर्ज भरला होता. महाविकास आघाडीत शिवसेनेने ही जागा प्रतिष्ठेची केली होती. पण लढत देण्याऐवजी ठाकरे गटाचे उमेदवार व माजी आमदार बाळ माने यांनी माघार घेतली. माघार घेताना मंत्री नितेश राणे हे माने यांच्याबरोबर असल्याने ठाकरे गटात अस्वस्थता पसरली. लगेचच बाळ माने यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचे खासदार संजय राऊत यांनी जाहीर केले.
आघाडीत आरोप-प्रत्यारोप
आठ मतदारसंघांमध्ये मविआच्या उमेदवारांनी माघार घेतली. यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. या माघारनाट्यावरून आघाडीतील घटक पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. पुण्यात काँग्रेसने शरद पवार गटावर विश्वासघात केल्याचा आरोप केला.
ठाकरे गटाच्या डोणगावकर यांची हकालपट्टी
छत्रपती संभाजीनगरमध्येही ठाकरे गटाच्या देवयानी डोणगावकर यांनी माघार घेतल्याने त्यांचीही पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. वर्धा-चंद्रपूरमध्ये अर्ज माघार घेताना काँग्रेस उमेदवाराने पक्षाच्या नेत्यांनाच दोष दिला. नाशिक मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे नरेंद्र दराडे यांच्या विरोधात भाजपच्या बंडखोराने उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने तेथे चुरस आहे.
वर्धा-चंद्रपूर-गडचिरोलीतून लखानी बिनविरोध
वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली मतदारसंघातून भाजपचे अरुण लखानी हे बिनविरोध निवडून आले. त्यांच्या विरोधातील काँग्रेस उमेदवाराने माघार घेतली. लखानी हे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे होणारे व्याही आहेत. पुढील आठवड्यात सुप्रिया यांच्या कन्येचा विवाह होणार आहे. लखानी हे मोठे उद्योगपती असून, भाजपचे पदाधिकारी आहेत.
बिनविरोध मतदारसंघ
ठाणे- रवींद्र फाटक (शिवसेना शिंदे) रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग : अनिकेत तटकरे (राष्ट्रवादी अजित पवार गट) पुणे : विक्रम काकडे ( अजित पवार गट) यवतमाळ : दुष्यंत चतुर्वेदी (शिंदे) वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली : अरुण लखानी (भाजप) अहिल्यानगर : प्राजक्त तनपुरे (भाजप) पक्षीय बलाबल भाजप -२, शिवसेना शिंदे- २, राष्ट्रवादी अजित पवार- २
