मुंबई: राज्यात राबविण्यात येत असलेल्या मतदार याद्यांची विशेष सखोल तपासणी(एसआयआर) मोहिमेंतर्गत नवमतदारांसह प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र नागरिकांना आपले नाव मतदार यादीत नोंदविण्याची अंतिम मुदत सोमवारपर्यंत आहे. तसेच मतदारांना नांव नोंदणीसाठी शनिवार- रविवारी राज्यातील सर्व मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या संधीचा लाभ घेऊन मतदारांनी अंतिम मतदार यादीत आपले नाव नोंदवावे, , असे आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी एस. चोकलिंगम यांनी केले आहे.

निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार गेल्या दोन महिन्यांपासून राज्यात मतदार याद्यांची विशेष सखोल तपासणी मोहिम राबविली जात आहे. ३१ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीत यापूर्वीच्या मतदार यादीतील २ कोटी मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. या मतदारांना पुन्हा मतदार यादीत नांवे नोंदविण्यासाठी संधी देण्यात आली असून आतापर्यंत ७ लाख १९ हजार ३८२ मतदारांनी नमुना-६ मध्ये अर्ज दाखल केले आहेत. मतदार यादीतील नोंदींमध्ये दुरुस्तीसाठी ३ लाख ९९ हजार ९२५ मतदारांनी अर्ज नमुना-८ मध्ये, तर नावे वगळण्यासाठी १८ हजार ७४८ अर्ज नमुना-७ मध्ये अर्ज दाखल केले आहेत.

नवमतदारांना नोंदणीची संधी

१ ऑक्टोबर या अर्हता दिनांकास किंवा त्यापूर्वी वयाची १८ वर्षे पूर्ण करणारे नवमतदार तसेच अन्य पात्र असूनही प्रारूप मतदार यादीत नाव समाविष्ट न झालेल्या नागरिकांना नमुना-६ भरून नाव नोंदविता येतील. त्यासाठी हे अर्ज संबंधित मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी किंवा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याकडे ऑफलाइन पद्धतीने सादर करता येतील. तसेच शनिवार- रविवारी आयोजित विशेष शिबिरांमध्येही अर्ज दाखल करता येतील. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या https://voters.eci.gov.in/ या संकेतस्थळाचा वापर करता येईल.

प्रारुप मतदार यादीत नांव आल्यानंतरही नोटीस प्राप्त झालेल्या मतदारांनाही विशेष शिबिरांमध्ये संबंधित कागदपत्रे सादर करता येतील. विशेष म्हणजे आयोगाने नोटिशीत नमूद केलेल्या आधार, शिधापत्रिका, पासपोर्ट अशा विविध १३ प्रकारच्या कागदपत्रांपैकी आवश्यक कागदपत्र उपलब्ध नसल्यास अन्य वैध कागदपत्रे किंवा दस्तऐवज सादर करता येतील. यासाठी अन्य कागदपत्रे (‘Any Other Documents’) हा पर्याय बीएलओ ॲपवर उपलब्ध करून देण्यात आला आहे. मतदारांनी सोमवारची अंतिम मुदत लक्षात घेऊन आवश्यक अर्ज व कागदपत्रे वेळेत सादर करावीत आणि विशेष शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने केले आहे.