मुंबई : राज्यातील मतदारयाद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणी (एसआयआर) मोहिमेअंतर्गत राज्यातील २ कोटी ०६ लाख नावांचा प्रारुप मतदारयाद्यांमध्ये समावेश होऊ शकलेला नाही. मृत व दुबार नावे वगळता अन्य सर्व मतदारांना पुन्हा नाव नोंदविण्यासाठी महिनाभराची मुदत देण्यात आल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी एस. चोकलिंंगम यांनी दिली.

राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांच्या प्रारुप मतदार याद्या सोमवारी प्रसिध्द करण्यात आल्या. यात जुन्या मतदार यादीतील सुमारे दोन कोटी मतदारांची नावे विविध कारणांनी समाविष्ट करण्यात आलेली नाहीत. मृत व दुबार नावे वगळता आधीच्या मतदारयाद्यांमध्ये नावे असलेल्या पण प्रारुप यादीत स्थान न मिळालेल्या दीड कोटी मतदारांना पुन्हा नाव नोंदविता येऊ शकेल.

राज्यात एकूण ९कोटी ७८ लाख ५४ हजार ४९ मतदारांच्या मतदार याद्यांची संखोल तपासणी करुन या याद्या परिपूर्ण आणि अद्ययावत करण्यासाठी निवडणूक आयोगामार्फत गेले तीन महिने राज्यभर विशेष मोहिम राबविण्यात आली होती. या मोहिमेला मतदारांचा अधिकाधिक प्रतिसाद मिळावा यासाठी तीनवेळा मुदत वाढही देण्यात आली होती. मतदारांकडून गणना प्रपत्र भरुन घेऊन त्याच्या आधारे प्रारुप मतदार यादी जाहीर करण्यात आली असून त्यात ७ कोटी ७१ लाख ६५ हजार ५६२ (७८.८६टक्के) मतदारांना समाविष्ट करण्यात आले आहे.

त्यामध्ये ३ कोटी ९५ लाख ८९ हजार ९०५ पुरुष आणि ३ कोटी ७५ लाख ७२ हजार ५७० महिला मतदार आणि ३ हजार ८७ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. प्रारुप मतदार यादीमध्ये जुन्या मतदार यादीतील २ कोटी ६ लाख ८८ हजार ४८७ (२१.१४टक्के) मतदारांचा विविध कारणांनी समावेश होऊ शकलेला नाही. यामध्ये ३४ लाख मयत मतदारांची नावे रद्द करण्यात आली असून १७ लाख मतदारांची नावे दुबार होती. ती एका मतदार संघातून रद्द करण्यात आली आहेत.

याचाच अर्थ सुमारे ५० लाख मतदारांची नावे कायमची रद्द झाली असून उर्वरित दीड कोटी मतदारांना पुन्हा मतदार यादीत नांव नोंदविण्याची संधी आहे. या प्रारुप मतदारयाद्या भारत निवडणूक आयोगाचे Voter Service P (https://voters.eci.gov.in/), मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांचे संकेत (https://ceoelection.maharashtra.gov.in/ceo/) तसेच संबंधित जिल्हा निवडणूक अधिकार संकेतस्थळावर नागरिकांसाठी उपलब्ध आहेत.

नावे समाविष्ट का झाली नाहीत ?

एसआयआरपूर्वी मतदार याद्यांमध्ये नावे समाविष्ट असलेल्या ज्या मतदारांची नावे एसआयआर प्रक्रियेनंतरच्या प्रारुप मतदार यादीत विविध कारणांनी समाविष्ट झालेली नाहीत, अशा मृत, गैरहजर, स्थलांतरित किंवा गणना प्रपत्र भरून न दिलेल्या मतदारांची नावे त्याबाबतच्या कारणासह आयोगाच्या संकेत स्थळावर उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तसेच प्रारुप मतदार याद्या सॉफ्ट तसेच हार्ड प्रतिमध्ये मान्यता प्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना जिल्हास्तरावर उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.

मतदार यादीत पुन्हा नावनोंदणीची संधी

ज्या पात्र मतदारांची नावे प्रारुप मतदार यादीमध्ये समाविष्ट झालेली नसतील तसेच १ ऑक्टोबर २०२६ या दिनांकास किंवा त्यापुर्वी वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या नवमतदारांना आपले नाव मतदार यादीमध्ये समाविष्ठ करण्यासाठी प्रपत्र-६ त्यासोबतच्या घोषणापत्रासह भरता येईल, ज्यायोगे योग्य पडताळणीनंतर संबंधित मतदान नोंदणी अधिकारी सदर प्रपत्रावर उचित निर्णय घेतील व पात्र मतदारांचे नांव अंतिम मतदार यादीमध्ये समाविष्ट होतील अशी माहीती चोकलिंगम यांनी दिली. तसेच मतदार यादीमधील एखाद्या नावाबाबत आक्षेप असल्यास, संबंधित मतदार संघातील मतदार असलेली प्रपत्र- ७ मध्ये आक्षेप नोंदवता येतील. तसेचमतदार यादीमधील नोंदीमध्ये काही सुधारणा करावयाच्या असल्यास (उदा. मतदाराचे नाव, पत्ता, वय, लिंक संबंधित मतदार प्रपत्र- ८ द्वारे अशी विनंती विनंती करता येईल.

दावे व हरकतीच्या कालावधीत विधानसभा मतदारसंघ निहाय दाखल करण्यात आलेल्या दावे व हरकतींच्या याद्या मतदान नोंदणी अधिकारी यांच्याकडून प्रत्येक आठवड्यास तयार करण्यात येतील व अशा याद्या जिल्हा निवडणूक अधिकारी तसेच मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या संकेतस्थळावरदेखील उपलब्ध येतील. राज्यातील विधानसभा संघनिहाय २८८ मतदार नोंदणी अधिकारी असून ७००० पेक्षा जास्त सहायक मतदार नोंदणी अधिकारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. प्रारुप मतदार यांद्यांबाबत दावे व हरकतींचा निपटारा करण्यासाठी २९ ऑक्टोबर पर्यंत मुदत देण्यात आली असून ही कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर ४ नोव्हेंबर रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे चोकलिंगम यांनी सांगितले.

ठळक वैशिष्टे :

मोहिमेपूर्वी एकूण मतदार : ९ कोटी, ७८ लाख
प्रारुप यादीत समाविष्ट मतदार : ७ कोटी, ७१ लाख, ६५ हजार (७८.८६ टक्के)

पुरुष मतदार : ३ कोटी ९५ लाख
महिला मतदार : ३ कोटी ७५ लाख

तृतीयपंथ : ३०८७
नावे समाविष्ट न होऊ शकलेले मतदार : २ कोटी, ०६ लाख (२१.१४ टक्के)