मुंबई: राज्यात मतदार यांद्याच्या विशेष सखोल फेरतपासणी (एसआयआर) मोहिमेतून तब्बल २ कोटी ०७ लाख मतदार अपात्र ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामध्ये सर्वाधिक ३६ लाख मतदार मुंबईत तर ठाणे जिल्हयातून २८लाख मतदारांचा समावेश आहे. गणना प्रपत्र जमा न केल्याने ही नावे मतदार यादीतून वगळली जाणार आहेत. पुढील सोमवारी (२४ ऑगस्ट) प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध होणार असून त्यानंतर महिनाभरात या मतदारांना पुन्हा अपिल करण्याची संधी मिळणार आहे.

राज्यात १ जुलै ते १७ ऑगस्ट दरम्यान एसआयआर मोहिम राबविण्यात आली. राज्यातील एकूण ९ कोटी ७८ लाख ५४ हजार मतदारांपैकी ७ कोटी ७१ लाख ५० हजार(७८.८५टक्के) मतदारांकडून स्वाक्षरीसह प्राप्त झालेल्या गणना प्रपत्रांचे डिजिटायझेशन पूर्ण झाले असून सुमारे २ कोटी ७० लाख (२१.१५) टक्के मतदारांनी गणना प्रपत्र जमा केलेली नाहीत. प्रपत्र जमा झालेले नाही त्यामध्ये ७५ लाख ५२ हजार (७.७२ टक्के) मतदार त्यांच्या मतदार यादीतील पत्यावर आढळून आलेले नाहीत. ७६ लाख ८० हजार(७.८५ टक्के) मतदारांनी कायमस्वरुपी स्थलांतर केल्याचे आढळून आले असून ३४ लाख ८१ हजार(३.५६ टक्के) मृत मतदारांची नावे मतदार यादीत आढळून आली. अन्यत्र नोंदणी किंवा दुबार मतदारांची संख्या १७ लाख ६३ हजार आहे. विशेषत: मुंबई, ठाणे, नागपूर, पालघर, रायगड या जिल्हयांत गणना प्रपत्र जमा न करणाऱ्या मतदारांची संख्या अधिक आहे.

प्रारुप मतदार याद्या २४ ऑगस्टला प्रसिध्द करण्यात येणार आहे. या प्रारुप मतदार याद्या मान्यताप्राप्त राजकीय पक्षाना सॉफ्ट व हार्ड कॉपीच्या स्वरुपात उपलब्ध करुन देण्यात येतील. ज्यांची नावे प्रारुप मतदार यादीमध्ये नियमानुसार समाविष्ट करता आली नाहीत अशा मतदारांच्या नावांच्या याद्या संबंधित शासकीय कार्यालयांच्या सुचना फलकावर तसेच जिल्हा निवडणूक अधिकारी किंवा मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या संकेतस्थळावर सुध्दा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर पुढील एका महिन्याच्या कालावधीत सदर प्रारुप यादीच्या अनुषंगाने दावे व हरकती दाखल करता येतील. प्रारुप मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट नसलेले मतदार किंवा १ ऑक्टोबर२०२६ या अर्हता दिनांकापूर्वी वयाची १८ वर्षे पुर्ण केलेले नव मतदार यांना या कालावधीत मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना ६ (त्यासोबतच्या घोषणापत्र व आवश्यक कागदपत्रासह) भरण्याची सुविधा उपलब्ध राहील. त्यानंतर मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडून सदर अर्जाची पडताळणी करुन पात्र मतदारांची नावे अंतिम मतदार यादीत समाविष्ट करण्यात येतील. या एका महिन्याच्या कालावधीत (दावे व हरकतीचा कालावधी) मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी किंवा नोंदींमध्ये दुरुस्ती करण्यासाठी संबंधित मतदार अनुक्रमे नमुना ६ किंवा ८ भरु शकेल. तसेच संबंधित मतदार संघातील कोणताही मतदार सदर यादीतील कोणतीही नोंद वगळण्यासाठी नमुना ७ भरुन हरकत घेऊ शकेल अशी माहिती राज्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली.

काही प्रमुख जिल्ह्यांमधील किती मतदार वगळले जाऊ शकतात?

पुणे (२८.७० लाख), नागपूर (१४.४४ लाख), नाशिक (१०.२९ लाख), रायगड (५.८५ लाख), छत्रपती संभाजीनगर (६.०९ लाख),