मुंबई: मराठी माणसांनीच कष्ट करून महाराष्ट्राला उभे केले. मुंबई महाराष्ट्राचा स्वाभिमान तर आहेच शिवाय ती देशाची आर्थिक राजधानीसुद्धा आहे. त्यामुळे मराठी माणसाचे योगदान कमी लेखण्याचा कुठे प्रश्नच निर्माण होत नाही. आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याची सारवासारव चोहोबाजूने टीका होताच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शनिवारी केली. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अंधेरीत शुक्रवारी चौकाच्या नामकरणाच्या वेळी राज्यपालांनी महाराष्ट्र आणि मराठी माणसाबद्दल केलेल्या अवमानकारक वक्तव्यावरून राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. भाजपसह विरोधकांनीही राज्यपालांच्या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त करीत राज्याची माफी मागण्याची मागणी केल्यानंतर कोंडीत सापडलेल्या कोश्यारी यांनी पुन्हा एकदा आपल्या वक्तव्याचा विरोधकांनी विपर्यास केल्याचा दावा करीत स्वत:ला वाचविण्याचा प्रयत्न केला आहे.  आपल्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण करताना महाराष्ट्राच्या उभारणीत मराठी माणसाच्या कष्टाचे योगदान सर्वाधिक असल्याचे कोश्यारी यांनी म्हटले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी माणसाच्या या भूमीत राज्यपाल म्हणून आपल्याला सेवेची संधी मिळाली, याचा अभिमानच आहे. त्याचमुळे अतिशय अल्पावधीत मराठी भाषा अवगत करण्याचा आपण प्रयत्न केल्याचा दावा करीत, शुक्रवारी राजस्थानी समाजाच्या कार्यक्रमात आपण जे विधान केले त्यात मराठी माणसाला कमी लेखण्याचा कुठलाही हेतू नव्हता. केवळ गुजराती आणि राजस्थानी मंडळांनी व्यवसायात दिलेल्या योगदानावर बोलल्याचे स्पष्टीकरण कोश्यारी यांनी केले आहे. मराठी माणसांनीच कष्ट करून महाराष्ट्राला उभे केले. म्हणूनच आज अनेक मराठी उद्योजक नावाजलेले आहेत. ते केवळ महाराष्ट्रात नाही, तर भारतात आणि जगभरात मोठय़ा दिमाखात मराठीचा झेंडा रोवून आहेत. त्यामुळे मराठी माणसाचे योगदान कमी लेखण्याचा कुठे प्रश्नच निर्माण होत नाही; पण नेहमीप्रमाणे  आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. महाराष्ट्राच्या उभारणीत मराठी माणसाच्या कष्टाचे योगदान सर्वाधिक आहेच; परंतु अलीकडे प्रत्येक बाबतीत राजकीय चष्म्यातून बघण्याची दृष्टी विकसित झाली आहे, ती आपल्याला बदलावी लागेल. एका समाजाचे कौतुक हा दुसऱ्या समाजाचा अपमान कधीही नसतो. कारण नसताना राजकीय पक्षांनी त्यावर वाद निर्माण करू नये असे आवाहनही त्यांनी केले आहे. आपल्या हातून तरी मराठी माणसाचा अवमान कधीही होणार नाही. विविध जाती, समुदाय यांनी नटलेल्या या मराठी भूमीच्या प्रगतीत, विकासात सर्वाचेच योगदान आहे आणि त्यातही मराठी माणसाचे योगदान अधिक आहे, असेही कोश्यारी यांनी नमूद केले आहे.

कोश्यारी यांची आधीही वादग्रस्त विधाने

  • राज्यपाल कोश्यारी यांनी पुण्यात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळय़ाच्या अनावरण समारंभात केलेले विधानही वादग्रस्त ठरले होते. सावित्रीबाई यांचा विवाह १०व्या वर्षी झाला, तर त्यांच्या पतीचे वय १३ होते. त्यापुढे हसत हसत केलेले विधान वादग्रस्त ठरले होते. त्यावरून कोश्यारी यांच्यावर टीकाही झाली होती.
  •   छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांच्या गुरुशिष्याच्या नात्यावरून कोश्यारी यांनी औरंगाबादमध्ये बोलताना विधान केले होते. गुरुशिष्य नात्याबाबतच आक्षेप घेतला जातो. त्यावरून राज्यात वादही निर्माण झाला होता. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली होती.
  •   छत्रपती शिवाजी महाराज आणि सावित्रीबाई फुले यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानांच्या निषेधार्थ कोश्यारी हे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अभिभाषणाला आले असता काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादीच्या आमदारांनी घोषणाबाजी केली होती.
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra was built marathi people criticism governor summary ysh
First published on: 31-07-2022 at 00:02 IST